कोच्चीमधील एका भाजी व्यापाऱ्याने शहरातील पोलिसांकडे कांदा चोरीला गेल्याची तक्रार केली आहे. या व्यापाराने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार कांद्याचा संपूर्ण ट्रकच चोरीला गेला असून त्यामध्ये २५ टन कांदा आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यामधून व्यापाऱ्याने हा कांदा मागवला होता. मात्र अहमदनगरमधून निघालेला ट्रक कोच्चीला पोहचलाच नाही. विशेष म्हणजे सामान्यपणे आठवड्याभरात कोच्चीला पोहचणाऱ्या या कांद्याच्या ट्रकचा मागील महिन्याभरापासून काहीच थांगपत्ता लागलेला नाही. देशभरामध्ये कांद्याचे दर ८० रुपये प्रति किलोपर्यंत गेले असताना या कांद्याची किंमत ५० लाख असल्याचा दावा मालकाने केला आहे.

तक्रार दाखल करणाऱ्या व्यापाऱ्याचे नाव मोहम्मद सय्यद असं आहे. सय्यदने अहमदनगरमधून २५ टन कांदा कोच्चीमध्ये मागवला होता. मात्र तो कांदा एका महिन्यानंतरही सय्यदपर्यंत पोहचलेला नाही. “मी जेव्हा कांदा पाठवणाऱ्या शेतकरी सहकारी संघटनेला फोन केला तेव्हा त्यांनी मला कांद्याचा ट्र्क २५ सप्टेंबर रोजीच पाठवण्यात आल्याचे सांगितले. ट्र्क चालकाचा फोन स्वीच ऑफ आहे. या माल पळवल्याची मला शक्यता वाटते. कांदा मागवण्यात आला तेव्हा कांद्याचे दर वाढत होते. सध्याच्या बाजारभावाप्रमाणे या कांद्याची किंमत ५० लाखांपर्यंत असेल,” असं सय्यदने सांगितल्याचे वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिलं आहे. अहमदनगरमधील शेतकरी सहकारी संघटनेने कांदा ट्र्कमध्ये भरतानाचे फोटो आणि इतर माहितीही पुरावा म्हणून पाठवल्याचे सय्यदने सांगितलं आहे.

पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली असता हा कांदा घेऊन येणारा ट्रक चालक यापूर्वीही मालाची चोरी केल्याच्या प्रकरणात होताल असं आढळून आलं आहे. हा चालक एर्नाकुलममधील अलुवा येथे राहतो. हा कांदा चालकाने काळा बाजार करुन विकला असावा आणि त्यामधून पैसा कमवला असला अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या चालकाने आपला फोन बंद ठेवल्याने तो कुठे आहे हे फोन ट्रेस करुन शोधण्यात अडचणी येत आहे. यासंदर्भात आता महाराष्ट्रातील पोलिसांचीही मदत घेतली जात असल्याचे कोच्ची पोलिसांनी सांगितलं आहे.

एर्नाकुलममधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने यासंदर्भातील माहिती देताना, “यासंदर्भात कांदाची वाहतूक करणाऱ्या कंपनीनेही आमच्याकडे तक्रार केली असून या प्रकरणात आम्ही तपास सुरु केला आहे,” असं सांगितलं.