डोनाल्ड ट्रम्प यांचे वादग्रस्त वक्तव्य, विरोधकांची जोरदार टीका
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेले रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्याने वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकीय वादळ उठले आहे. बेकायदेशीरपणे गर्भपात करणाऱ्या महिलांना शासन केले पाहिजे, असे वक्तव्य ट्रम्प यांनी केल्याने विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली असून त्यांचे वक्तव्य भयंकर आणि लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान मुलाखतकाराने ट्रम्प यांना या बाबत प्रश्न विचारला होता. गर्भपात केल्यास शासन केले पाहिजे की नाही, असा प्रश्न विचारण्यात आला असता ट्रम्प म्हणाले की, यासाठी कोणत्या ना कोणत्या स्वरूपाची शिक्षा असावयास हवी. महिलेला शिक्षा हवी का, असा प्रश्न मुलाखतकाराने विचारला असता ट्रम्प यांनी काही प्रमाणांत शिक्षा गरजेची असल्याचे मत व्यक्त केले.
या वक्तव्यामुळे ट्रम्प यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे, त्याचप्रमाणे महिला कार्यकर्त्यांनीही सडकून टीका केली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिण्टन यांनी हे वक्तव्य भयंकर असल्याचे म्हटले आहे.
ट्रम्प हे प्रश्न जाणून न घेताच बेताल वक्तव्ये करतात हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे, केवळ आपल्याकडे लक्ष वेधले जावे असा त्यांचा प्रयत्न आहे, असे रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार टेड क्रूझ यांनी म्हटले आहे.