मासिक पाळीदरम्यान रक्तानं माखलेला पॅड घेऊन तुम्ही मित्राच्या घरी जाल का? असा प्रश्न विचारणाऱ्या स्मृती इराणींवर चांगलीच टिकेची झोड उठली आहे. शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश मिळण्यावरून विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना इराणींनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर त्यांनी सारवासारवही केली. मात्र आता याच प्रश्नावरून समाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी स्मृती इराणींवर निशाणा साधला आहे. ज्या संसदेला मंदिर म्हटले जाते त्या संसदेमध्ये स्मृती इराणी पाळी आल्यानंतर जात नाही का? असा सवाल देसाई यांनी उपस्थित केला आहे.

स्मृती इराणी यांच्या वक्तव्यावरून ‘बीबीसी मराठी’शी बोलताना तृप्ती देसाई यांनी इराणी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. या प्रकरणासंदर्भात बोलताना, ‘आपण देशाच्या संसदेला सुद्धा मंदिरच म्हणतो. आणि त्या मंदिरामध्ये स्मृती इराणी कॅबिनेट मिनिस्टर म्हणून काम करतात. तेव्हा मासिक पाळी आल्यावर त्या काम करत नाहीत का?’ असा सवाल देसाई यांनी उपस्थित केला. तसेच मासिक पाळी सुरु असताना मंदिरात काय मित्रांकडेही जाऊ नका असं ऐकवलं जातं, तरी मासिक पाळीत महिला कोणकोणतं काम करतात यासंदर्भात विचारले असता तृप्ती देसाई यांनी आपण मासिक पाळी सुरु असतानाही कधी दौरे रद्द केले नाही असे सांगितले. मी जेव्हा समाजामध्ये एक महिला कार्यकर्ता म्हणून काम करते तेव्हा अनेक कार्यक्रम, नियोजित दौरे असतात. नियोजित दौरा असतानाच अचानक मासिक पाळी आली तर तो दौरा आम्ही रद्द करत नाही. उलट अशा परिस्थितीही आम्ही उत्साहाने काम करतो. तसेच नवरात्र, गणेशोत्सवात आम्हाला अनेक ठिकाणी बोलावलं जातं. मात्र तेव्हा मासिक पाळी येईल म्हणून आम्ही एखादी तारीख देत नाही असं कधीच होतं नसल्याचंही देसाई यांनी सांगितलं.