सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठतम न्यायमूर्ती तीरथसिंग ठाकूर यांना देशाचे ४३वे सरन्यायाधीश म्हणून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गुरुवारी शपथ दिली.
राष्ट्रपती भवनाच्या दरबार सभागृहात झालेल्या एका छोटेखानी समारंभात ६३ वर्षांचे ठाकूर यांनी ईश्वरसाक्षीने शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी आणि माजी मुख्य न्यायमूर्ती या वेळी हजर होते.
न्या. ठाकूर हे बुधवारी सेवानिवृत्त झालेले न्या. एच. एल. दत्तू यांची जागा घेतील. ४ जानेवारी १९५२ रोजी जन्म झालेले न्या. ठाकूर यांची एक वर्षांहून थोडी अधिक काळाची राहणार असून, २०१७ साली ते निवृत्त होतील.
एच. एल. दत्तू यांच्यासह के. जी. बालकृष्णन, सरोष कपाडिया, राजेंद्रमल लोढा या माजी सरन्यायाधीशांसह निरनिराळ्या उच्च न्यायालयांचे न्यायाधीश, कायदेतज्ज्ञ सोली सोराबजी, अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी हेही या वेळी उपस्थित होते.