भूप्रदेशावर आधारित ट्विट्सच्या माध्यमातून शहर नियोजन व जमिनीचा वापर याबाबत माहिती मिळू शकते असे नवीन अभ्यासात दिसून आले आहे.
माद्रिद, मॅनहटन व लंडन या तीन ठिकाणी करण्यात आलेल्या संशोधनानुसार ट्विट्सच्या मदतीने रात्रीच्या वेळी शहरात जास्त हालचाली किंवा वर्दळ कोठे असते हे समजते. रोज लाखो लोक त्यांच्या भूप्रदेशातील घडामोडींशी संबंधित माहिती मोबाइल अॅप्लिकेशन व सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून देत असतात.
ट्विटरवर लोक व पर्यावरण यांच्यातील परस्परसंबंधावर प्रकाश पडतो व त्यामुळे शहर नियोजनासाठी मार्गदर्शक तत्त्वे ठरवता येतात. शहर नियोजनात जमिनीचा वापर रात्रीच्या वेळी महत्त्वाचा ठरतो. तेथे गोंगाट व धूळ यांचे प्रमाण वाढू शकते ही स्थिती सुधारता येऊ शकते. एनरिक व व्हॅनेसा फ्रायस मार्टिनेझ या संशोधकांनी माद्रिदमधील टेलेफोनिका रीसर्च येथे तर अमेरिकेतील मेरीलँड विद्यापीठात संशोधन करून असे सुचवले आहे, की भूप्रदेशकेंद्रित ट्विट्समुळे शहर नियोजन व जमिनीचा वापर चांगल्या प्रकारे करता येतो. नियोजनासाठी ट्विटरवरील माहितीस्रोत म्हणून वापरता येते, कारण त्यावर अनेक लोक संदेश टाकत असतात ते एका विशिष्टवेळी कुठे आहेत व काय करीत आहेत हे समजत असते असे एनरिक यांचे म्हणणे आहे.
संशोधकांच्या म्हणण्यानुसार स्मार्टफोनमुळे ट्विटर, फेसबुक या सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांचा वापर वाढला असून मोठय़ा प्रमाणावर माहिती निर्माण होत आहे. ट्विटरवर अक्षांश-रेखांशाची माहितीही वापरता येते.
जमिनीचा वापर कसा होतो आहे हे ट्विटरवर कळते असे संशोधकांचे म्हणणे आहे. प्रश्नावलीच्या माध्यमातून जी माहिती कळणार नाही ती यात कळत असते. काही लोक एका विशिष्ट भूप्रदेशात जमून काही कृती करत असतात तेव्हा ते यात कळते.
मॅनहटन, माद्रिद व लंडन या शहरांतील जमीन वापराबाबत माहिती मिळवण्यात संशोधकांना या पद्धतीने यश आले आहे. हे संशोधन जर्नल ऑफ इंजिनिअरिंग अॅप्लिकेशन्स ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.

शोध घेण्यासाठी वापर
’ निवासी क्षेत्र
’ व्यावसायिक क्षेत्र
’ दिवसा विरंगुळय़ाची ठिकाणे (उद्योन व पर्यटन केंद्रे)
’ रात्रीच्या वेळचे जीवन
’ लंडनमध्ये औद्योगिक क्षेत्र ओळखण्यात यश
भूप्रदेशकेंद्रित ट्विट्समुळे शहर नियोजन व जमिनीचा वापर चांगल्या प्रकारे करता येतो. नियोजनासाठी ट्विटरवरील माहितीस्रोत म्हणून वापरता येते, कारण त्यावर अनेक लोक संदेश टाकत असतात ते एका विशिष्टवेळी कुठे आहेत व काय करीत आहेत हे समजत असते