मध्य प्रदेशनंतर आता गुजरातमध्ये देखील काँग्रेसला धक्का बसणार असल्यीच चिन्हं दिसत आहेत. गुजरातमध्ये राज्यसभेच्या चार जागांसाठी २६ मार्च रोजी होणाऱ्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला घोडेबाजार होण्याची चिंता सतावत आहे. विजय रुपाणी सरकारमधील मंत्री कुंवरजी बावलिया यांचा दावा आहे की, काँग्रेसच्या दोन आमदारांनी राजीनामा दिला आहे. तर अन्य तीन आमदारांचा मोबाईल बंद येत आहेत. हे पाच आमदार आता भाजपाला पाठिंबा देणार असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

आमदारांची पळापळ होण्याची शक्यता पाहता काँग्रेसकडून १४ आमदारांना अगोदरच जयपूरला पाठवण्यात आलं आहे. तर, आता आणखी ३६ आमदारांना देखील राजस्थानला पाठवले जाऊ शकते. सर्व आमदार त्या ठिकाणी एका अलिशान रिसॉर्टमध्ये थांबलेले आहेत. त्यांना उदयपूर येथे हलवले जाण्याचीही शक्यता आहे. तर अन्य पाच आमदारांना गुजरातमध्येच एका रिसॉर्टमध्ये थांबवले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. जवळपास १५ ते १८ आमदार गुजरातमध्ये थांबणार आहेत व विधानसभेच्या कामकाजात सहभागी होणार आहेत.

सर्व आमदारांना मोबाईल बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. एवढंच नाहीतर त्यांना कुटुंबातील सदस्यांना किंवा ओळखीच्या व्यक्तींना भेटण्यास परवानगी देखील देण्यात आलेली नाही. राजस्थानमधील अशोक गहलोत यांचे सरकार काँग्रेस हायकमांडच्यादृष्टीने सर्वात सुरक्षित सरकार असल्याचे बोलले जात आहे.

गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी शुक्रवारी म्हटले होते की, काँग्रेसने पाटीदार समाजाच्या उमेदवारास तिकीट दिले नाही व पक्षात अंतर्गत गटबाजी देखील आहे. याचा फायदा भाजपाला होणार आहे. त्यांनी भाजपा तीन जागा जिंकेल असा विश्वासही व्यक्त केला होता. तर, दुसरीकडे काँग्रेस नेते भरतसिंह सोलंकी यांनी राज्यसभा निवडणुकीत भाजपा तोंडावर आपटणार असल्याचे म्हटले आहे.

गुजरातमधील जागांची आकडेवारी –
विधानसभेच्या एकूण जागा – १८०
भाजपा – १०६ (भाजपा-१०३ , मित्रपक्ष – ३)
काँग्रेस – ७४ (काँग्रेस -७३ व जिग्नेश मेवाणी)
गुजरातमध्ये राज्यसभेच्या एकूण चार जागा आहेत. राज्यसभेची एक जागा जिंकण्यासाठी ३७ आमदारांची आवश्यकता. सद्यस्थितीस भाजपा राज्यसभेच्या दोन जागा सहज जिंकू शकते. तर काँग्रेस स्वबळावर एक जागा जिंकू शकते. जर काँग्रेसच्या पाच आमदारांनी राजीनामा दिला व तो मंजूर झाला तर १८० जागा असलेल्या गुजरात विधासभेत १७५ आमदार राहतील. तसेच, भाजपा व मित्रपक्षाच्या १०६ व काँग्रेस व जिग्नेश मेवाणी मिळून ६९ जागा राहतील. यानुसार राज्यसभेच्या एका जागेसाठी ३६ आमदारांची आवश्यकता भासेल.

भाजपाने अभय भारद्वाज, रमीवा बेन बारा आणि नरहरी अमीन यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसकडून शक्तीसिंह गोहील आणि भरतसिंह सोलंकी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

सद्यस्थिती पाहता भाजपा दोन व काँग्रेस एका जागेवर आरामात विजयी होऊ शकते. मात्र जर काँग्रेसच्या दोन आमदारांनी क्रॉस वोटींग केली तर भाजपाच्या वाट्याला तीन जागा येऊ शकतात. भाजपाकडे १०६ आमदारांची संख्या आहे. राज्यसभेच्या तीन जागा जिंकण्यासाठी त्यांना आणखी केवळ दोन मतांची आवश्यकता आहे. जी त्यांना काँग्रेस आमदारांच्या क्रॉस वोटींगमुळे मिळू शकतात. परंतु, जर असं झालं नाही कोणत्याच आमदाराने क्रॉस वोटींग केलं नाही तर भाजपाच्या तिसऱ्या उमेदवाराकडे जिंकण्यासाठी आवश्यक ३६ मतांपेक्षा अधिक एकूण ७२ मतं असतील. ही मतं दुसऱ्या क्रमांकाच्या पसंतीचे असतील. काँग्रेसच्या उमेदवाराकडे दुसऱ्या क्रमांकाची केवळ ३६ मतं असतील. हे पाहता भाजपाकडे असलेल्या मतांचा आकडा हा काँग्रेसपेक्षा अधिक असल्याने भाजपाचा तिसरा उमेदवार विजयी होऊ शकतो.
२०१७ मध्ये गुजरात राज्यसभेच्या तीन जागांसाठी देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना विजयी करण्यासाठी काँग्रेसने आपल्या आमदारांना कर्नाटकत पाठवलं होतं. तर काही आमदारांनी क्रॉस वोटींग देखील केलं होतं मात्र एवढं होवून देखील अहमद पटेल विजयी झाले होते.