अल-कायदाच्या दोघा संशयित दहशतवाद्यांना बुधवारी दिल्ली आणि ओदिशातून अटक करण्यात आल्याने भारतीय उपखंडातील दहशतवादी गटांच्या कारवाया मोडून काढल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे.
मोहम्मद आसिफ (४१) असे एका संशयिताचे नाव असून तो भारतीय उपखंडातील अल-कायदाचा संस्थापक सदस्य असल्याचे समजते. त्याला दिल्लीच्या वायव्य भागातील सीलमपूर येथून अटक करण्यात आली, तर अब्दुल रेहमान (३७) या दुसऱ्या संशयिताला बुधवारी ओदिशाच्या कटक जिल्ह्य़ातील जगतपूर परिसरातून अटक करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले.
दिल्ली आणि भुवनेश्वर-कटक आयुक्तालयाच्या पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत रेहमान याला त्याच्या पश्चिमकच्चा गावातून पहाटे अटक करण्यात आली, असे पोलीस आयुक्त आर. पी. शर्मा यांनी भुवनेश्वर येथे वार्ताहरांना सांगितले. या दोघांकडून पोलिसांनी तीन भ्रमणध्वनी, एक लॉपटॉप आणि अन्य साहित्य जप्त केले.
रेहमान याचे सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि दुबईत आंतरराष्ट्रीय संबंध असल्याचा संशय आहे. रेहमान हा विवाहित असून त्याला तीन मुले आहेत आणि तो कटकजवळच्या तांगी येथे मदरसा चालवितो.
त्याचा भाऊ ताहीर अली याला २००१ मध्ये कोलकातामधील अमेरिकेच्या केंद्रावर हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.