काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. शुक्रवारी दुपारी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे ही बैठक होणार असून, यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत सहभागी होणार आहेत. देशात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे.

राज्यात विधानसभा निवडणुका झाल्यानंतर वेगळं राजकीय चित्र निर्माण झालं. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं एकत्र येत राज्यात सरकार स्थापन केलं. त्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे हे काँग्रेसध्यक्षा सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये सहभागी होणार आहे. इंडियन एक्स्प्रेसनं शिवसेनेतील सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे.

देशात करोनामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या रुग्ण संख्येबरोबर बेरोजगारी आणि स्थलांतरित मजुरांचा प्रश्न गंभीर बनला आहे. लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. त्यामुळे आर्थिक संकटानंही डोकं वर काढलं असून, केंद्र सरकारनं पॅकेज जाहीर केलं आहे. या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या पुढाकारानं देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलवण्यात आली आहे. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उपस्थित राहणार आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊतही या बैठकीत सहभागी होणार आहे. या बैठकीला १८ पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत.

करोनाची परिस्थिती सरकारकडून कशा पद्धतीनं हाताळली जात आहे, या विषयावर या बैठकीत चर्चा होणार आहे. त्याचबरोबर स्थलांतरित मजुरांच्या विषयावरही चर्चा होणार असल्याचं सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले. दरम्यान, राज्यांसमोरील आर्थिक अडचणी आणि केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीसंदर्भातही या बैठकीत चर्चा होऊ शकते. त्याचबरोबर लॉकडाउन शिथिल करण्याच्या कार्यक्रमावरही चर्चा होण्याची चिन्ह आहे.