सेना- भाजपमधली खडाखडी काही केल्या संपत नाहीये. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तिथल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ केल्यावर या मुद्द्याला धरून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. योगी आदित्यनाथांविषयी चांगले उद्गार काढताना उध्दव ठाकरेंनी कर्जमाफीच्या त्यांच्या निर्णयाचं स्वागत केलं. पण त्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही त्यांचा कित्ता गिरवावा असे म्हणत देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर त्यांनी शरसंधान केलंय. एएनआयशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

उत्तर प्रदेशात सत्ता आल्यास आपण शेतकऱ्यांची कर्ज माफ करू या वचनाची पूर्तता योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने केली आहे. त्यांनी उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांची ३०,७२९ कोटी रूपयांचं कर्ज माफ केलं आहे.

उध्दव ठाकरे यांनी निर्णयाचं स्वागत केलं आहे. पण त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून याचं श्रेय त्यांनी भाजपला न देता योगी आदित्यनाथांना दिल्याचं दिसून येतंय.

दरम्यान काॅग्रेसने कर्जमाफीचा निर्णय चांगला असल्याचं सांगतानाच भाजप नेते अर्धसत्य सांगत असल्याची टीका केली आहे. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी याबाबतीत भाजपने त्यांचं वचन पूर्ण न केल्याची टीका केली आहे.

आज उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली. त्या बैठकीत कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला. भारतीय जनता पक्षामध्ये आमचे सरकार आल्यावर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे नेत्यांनी म्हटले होते. पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेऊ असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी म्हटले होते. त्याप्रमाणेच भारतीय जनता पक्षाने ही कर्जमाफी दिली आहे. शेतकऱ्यांसाठी ३६,००० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.

योगी आदित्यनाथ यांच्या या निर्णयामुळे उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. १ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या उत्तर प्रदेशात अडीच कोटी आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे दलालांकडून शोषण होणार नाही याची विशेष काळजी घेतली जाईल असे सरकारने स्पष्ट केले.

ज्या प्रमाणे तुम्ही उत्तर प्रदेशात कर्जमाफीची घोषणा केली त्याप्रमाणे तुम्ही महाराष्ट्रात का करत नाही अशी मागणी महाराष्ट्रातील भाजपेतर सर्वच पक्षांनी केली होती. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी शिवसेनेनी भारतीय जनता पक्षाला वेळोवेळी आवाहन केले आहे तर विरोधी पक्षांनी या मुद्दावरुन कित्येकदा विधानसभेत गदारोळ केला. यामुळे १९ आमदारांना निलंबित करण्यात आले. तसेच महाराष्ट्रात संघर्ष यात्रेचे आयोजनही विरोधकांनी केले.