ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून ते सेल्फ आयसोलेशनमधून बाहेर आले आहेत. त्यांचा करोना व्हायरस चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. आयुर्वेदीक औषधांमुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचा दावा केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी केला होता. मात्र राजघराण्याच्या प्रवक्त्यांनी हा दावा फेटाळला आहे. आयुर्वेदमुळे प्रिन्स चार्ल्स ठीक झाल्याची माहिती चुकीची आहे, असं राजघराण्याच्या प्रवक्त्या एला लिंच यांनी सांगितलं.

प्रिन्स चार्ल्स यांनी फक्त ब्रिटीश नॅशनल हेल्थ सर्व्हिस यांच्याकडून वैद्यकीय सल्ला घेतला. याव्यतिरिक्त त्यांनी काहीच केलं नाही, असं त्या म्हणाल्या. गुरुवारी केंद्रीय आयुष मंत्री म्हणाले, “बेंगळुरू येथे एका आयुर्वेदिक डॉक्टरचा ‘सौख्य’ नावाचा आयुर्वेद रिसॉर्ट आहे. त्यांनी मला फोन करून सांगितलं की प्रिन्स चार्ल्स यांचा करोना त्यांच्या आयुर्वेदीक औषधांमुळे बरा झाला. हे औषध आयुर्वेद आणि होमिओपॅथी यांचं मिश्रण आहे.” मात्र आयुष मंत्र्यांचे हे सर्व दावे राजघराण्याच्या प्रवक्त्यांनी फेटाळले आहेत.

२५ मार्च रोजी ७१ वर्षीय प्रिन्स चार्ल्स यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांचं विलगीकरण करण्यात आलं. मात्र आता ते पूर्णपणे बरे झाल्याची माहिती समोर येत आहे. प्रिन्स यांची प्रकृती उत्तम असून ते सरकारी निर्बंधांचे पालन करत आहेत. ते घरातूनच काम करणार आहेत असे क्लेअरन्स हाऊस रॉयल ऑफिसकडून सांगण्यात आले.