News Flash

ट्रेन, एक्सप्रेस- वे विसरा, हायपरलूपने मुंबई – पुणे प्रवास अवघ्या २५ मिनिटांत

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसोबत अधिका-यांची चर्चा

हायपरलूप ट्रेनचा प्रकल्प (छायाचित्र सौजन्य - हायपरलूप वन कंपनीचे संकेतस्थळ )

मुंबई – पुणे प्रवासासाठी तासन तास खर्ची होत असलेल्या प्रवाशांना आता दिलासा मिळणार आहे. हायपरलूप ट्रान्सपोर्टेशन तंत्रज्ञानामुळे मुंबई – पुणे प्रवास अवघ्या २५ मिनिटांमध्ये शक्य होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत कंपनीच्या अधिका-यांनी चर्चादेखील आहे.

विविध इंग्रजी संकेतस्थळांनी दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकेतील हायपरलूप ट्रान्सपोर्टेशन टेक्नॉलॉजी या कंपनीने केंद्र सरकारकडे हायपरलूप प्रकल्पासाठी जागा मागितली आहे. कंपनीला भारतात प्रायोगिक प्रकल्प राबवायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई – अहमदाबादमध्ये बुलेट ट्रेन सुरु करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. यानंतर आता बुलेट ट्रेनपेक्षा तिप्पट वेगाने धावण्याची क्षमता असलेल्या हायपरलूप ट्रेनचे स्वप्न रंगवले जात आहे. कंपनीच्या अधिका-यांनी केंद्रीय भूपृष्ठ आणि जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत चर्चाही केली आहे. त्यांनीही या प्रकल्पाला अनुकुलता दर्शवली आहे. आम्ही त्यांच्यावर दबाव टाकलेला नाही, आम्हाला फक्त जागा हवी आहे असे कंपनीचे म्हणणे आहे. हायपरलूप कंपनीमध्ये सध्या ८०० अभियंते कार्यरत असून त्यातील २५ अभियंते हे भारतातील आहेत.
टेस्ला कंपनीचे संस्थापक एलॉन मस्क यांना २०१३ मध्ये हायपरलूप ट्रेनची संकल्पना सुचली होती. तेव्हापासून हायपरलूप ट्रेन विकसित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
काय आहे हायपरलूप तंत्रज्ञान ?
हायपरलूप तंत्रज्ञानामध्ये हवेच्या निर्वात पोकळीतून गतिरोधाशिवाय विशिष्ट वाहनातून प्रवासी किंवा सामानाची ने – आण करणे शक्य होते. यासाठी विशिष्ट प्रकारच्या ट्यूबची (बोगदा) निर्मिती करावी लागते. या ट्यूबमध्ये कॅप्सूलच्या आकाराचे डबे असतात. हे डबे ट्यूबमधील चुंबकीय तंत्रज्ञान असलेल्या रुळांवरुन धावतील. ट्यूबमध्ये हवे प्रतिरोध नसल्याने आणि चुंबकीय तंत्रज्ञानामुळे हे डबे विमानाच्या वेगाने धावू शकतात. एका डब्यामधून २८ ते ३० प्रवासी प्रवास करु शकतात. ३० सेकंदानंतर प्रत्येक कॅप्सूल सोडता येईल असा दावा कंपनीच्या अधिका-यांनी केला आहे. हायपरलूप ट्रेनचा वेग हा ध्वनीच्या वेगाइतका असल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे हायपरलूप कंपनीने भारतात हा प्रकल्प राबवण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे.
हायपरलूपसाठी येणारा खर्च ?
बुलेट ट्रेनसाठी प्रति किलोमीटर २०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर हायपरलूपसाठी प्रति किलोमीटर २६० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पण बुलेट ट्रेनपेक्षा हायपरलूप ट्रेनच्या देखभाल दुरुस्तीवर होणारा खर्च खूप कमी आहे.
किती महिन्यात धावणार हायपरलूप ट्रेन ?
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार सरकारने जागा उपलब्ध करुन दिल्यानंतर ३८ महिन्यांत हायपरलूप ट्रेनचा प्रकल्प पूर्ण होऊ शकेल.
हायपरलूप ट्रेनसमोरील आव्हान ?
हायपरलूपचा प्रयोग आत्तापर्यंत सरळ रेषेत असलेल्या ट्यूबमध्ये झाला आहे. मुंबई – पुणे या मार्गावर डोंगर – द-या आहेत. चढ किंवा उतारावर हायपरलूप ट्रेनवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान कंपनीसमोर आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या संपूर्ण प्रवासात प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न कंपनीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 9:20 pm

Web Title: ultrafast hyperloop train proposal between mumbai pune
Next Stories
1 चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीतावेळी अपंगांना उभे राहण्याची सक्ती नाही: सर्वोच्च न्यायालय
2 जयललितांचे स्मारक बांधण्यासाठी ‘त्या’ने सोडली पोलिस खात्यातील नोकरी
3 नोटाबंदी: देशवासियांनो, सावध राहा; माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा ‘इशारा’
Just Now!
X