केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. ही वाढ १ जुलै २०१८ पासून लागू होणार आहे.

ज्या प्रमाणात महागाईचा दर वाढतो त्या प्रमाणात निवृत्तीवेतनधारक व कर्मचाऱ्यांना राहणीमानात संतुलन ठेवता यावे, यासाठी महागाई भत्ता दिला जातो. साधारणपणे किरकोळ महागाईच्या दराशी या भत्त्याची सांगड असते. दिल्लीत बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत केंद्रीय कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे महागाई भत्त्याचे प्रमाण आता सात वरुन नऊ टक्क्यांवर पोहोचले आहे.

महागाई भत्त्यात वाढ केल्याचा सुमारे ४८. २१ लाख कर्मचारी आणि ६२. ०३ लाख निवृत्तीवेतनधारकांना लाभ मिळणार आहे. महागाई भत्तावाढीमुळे सरकारी तिजोरीवर वर्षाला ६ हजार ११२ कोटी रुपयांचा भार पडणार आहे. तर २०१८- १९ या आर्थिक वर्षातील जुलै २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या आठ महिन्यांच्या कालावधीत हा भार ४ हजार ०७४.८० कोटी रुपयांवर जाईल.