देशात खेडोपाडी मोबाइल नेटवर्क पोहोचल्याचा कितीही दावा केला जात असला तरी एका घटनेमुळे मात्र तो फोल ठरल्याचे दिसत आहे. ही समस्या सर्वसामान्यांना नेहमी येतेच पण जेव्हा एखाद्या केंद्रीय मंत्र्याला याचा सामना करावा लागतो. तेव्हा त्या बाबतचे गांभीर्य जरा वाढल्याचे दिसून येते. झालं असं की, केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल हे राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यातील श्रीडूंगरगडपासून सुमारे १२ किमी दूर असलेल्या धोलिया गावी गेले होते. मेघवाल यांनी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. आम्ही आमच्या समस्या अधिकाऱ्यांना सांगतो, पण ते आमचं ऐकत नाहीत, असे ग्रामस्थांनी मेघवाल यांना सांगितले. हे ऐकताच मेघवाल यांनी त्वरीत अधिकाऱ्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला. पण लोकांनी या गावात मोबाइल नेटवर्क नसल्याचे सांगितले. तेव्हा खुद्द मेघवाल यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

त्यानंतर ग्रामस्थांनीच मेघवाल यांना मोबाइल नेटवर्क मिळवण्याचा उपाय सांगितला. जर त्यांनी झाडाला शिडी लावून त्यावर चढून मोबाइल लावला तर नेटवर्क मिळेल, असा सल्ला दिला. लगेचच त्यांच्यासाठी शिडीची सोय करण्यात आली. आश्चर्य म्हणजे मेघवाल यांनी असे करताच त्यांचा फोन लागला. झाडावरच त्यांनी अधिकाऱ्यांना फोन लावला आणि गावातील समस्येबाबत सांगितले.

मेघवाल यांच्या या कृतीमुळे ग्रामस्थ जरी प्रभावित झाले असले तरी या समस्येमुळे देशातील ग्रामीण भागातील सत्यही सर्वांसमोर आले आहे. यामुळे १०० टक्के मोबाइल नेटवर्कचा दावा करणाऱ्या कंपन्यांचीही पोलखोल झाली आहे. येथील ग्रामस्थांनी यापूर्वी याबाबत तक्रार करूनही ती दूर करण्यात आलेली नाही.