राजकीय नेत्यांच्या कोणत्याही बोलण्याला ‘होय होय’ असे म्हणत त्यांची हुजरेगिरी न करता, महत्त्वाच्या पदावर बसलेल्या नेत्यांच्या चुकीच्या निर्णयाविरोधात कठोर कारवाई करा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी नागरी सेवेतील अधिकाऱ्यांना केले आहे.
प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कायम नि:पक्षपाती भूमिका घेणे आवश्यक असून, एखादा निर्णय घेताना डळमळीत भूमिका न घेता संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. देश आणि जनतेच्या हितासाठी कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता आपले काम सुरू ठेवले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. ११व्या ‘नागरी सेवा दिना’निमित्त आयोजित कार्यक्रमात देशभरातून एकत्र आलेल्या अधिकाऱ्यांना ते संबोधित करत होते.

जर एखादा राजकीय नेता चुकीचा निर्णय देत असेल तर अधिकाऱ्यांनी त्याला न घाबरता कायदा आणि नियम दाखवण्याची आवश्यकता आहे. असे आदेश देऊन आपण कायद्याचे उल्लंघन करत आहात हे त्यांना सांगण्याची गरज आहे. नेत्यांनी दिलेल्या चुकीच्या निर्णयाच्या संबंधित फाइल्सवर सही करू नये. आणि नेत्यांच्या बोलण्याला हो बोलून हुजरेगिरी न करता नियमांचे पालन करावे, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
जनतेच्या विकासासाठी काम करा
देश आणि देशातील जनतेच्या विकासासाठी अधिकाऱ्यांनी काम करणे आवश्यक आहे. नागरी सेवा ही एक ताकद आहे. पद हे अधिकाऱ्यांना जबाबदार, तटस्थ बनवते, याची जाणीव कायम लक्षात ठेवली पाहिजे. आपण घेतलेल्या निर्णयाचा समाजावर मोठा परिणाम होत असतो, असे सांगत त्यांनी समाज बदलवण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांची यावेळी स्तुती केली.