लोकजनशक्ती पार्टीचे (लोजपा) संस्थापक आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान शनिवारी अनंतात विलीन झाले. पाटण्याच्या दीघा येथील जनार्दन घाटावर शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लोजपाचे अध्यक्ष आणि पासवान यांचे पुत्र चिराग यांनी त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी चिराग हे खूपच भावूक झाले होते, त्यामुळे काहीकाळ ते बेशुद्ध पडले होते. यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित लोकांनी त्यांना सावरलं.

दीघा घाटावर रामविलास पासवान यांना अंतिम निरोप देण्यासाठी जनसागर उसळला होता. मोठ्या संख्येने लोकांनी साश्रूनयनांनी आपल्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली. या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमाला बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे प्रमुख नीतीशकुमार, उपमुख्यमंत्री सुशील मोदी, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, गिरिराज सिंह, नित्यानंद राय आदी उपस्थित होते. या सर्वांनी पासवान यांनी श्रद्धांजली वाहिली.

रामविलास पासवान यांचे दीर्घ आजाराने आज (गुरुवार) निधन झाले, ते ७४ वर्षांचे होते. गेल्या महिनाभरापासून पासवान यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. नुकतीच त्यांच्यावर हृदयशस्त्रक्रियाही झाली होती. तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती.

बिहारच्या राजकारणातील दलित समाजाचे एक बडे नेते म्हणून त्यांची ओळख होती. अनेक वर्षांच्या आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी व्ही. पी. सिंह, एच. डी. दैवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी या पंतप्रधानांसोबत कॅबिनेटमध्ये त्यांनी काम केलं. अशी उज्ज्वल राजकीय कारकिर्द असलेले रामविलास पासवान हे देशातील एकमेव नेते होते.