चीन, इटली आणि स्पेन पाठोपाठ आता अमेरिकेमध्ये करोना व्हायरसने मृत्यूचा तांडव घातला आहे. दिवसागणिक अमेरिकेत करोना बाधितांच्या मृत्यूचा आकडा वाढताना दिसत आहे. मागील २४ तासांत अमेरिकेमध्ये करोना व्हायरसने तब्बल २१०८ लोकांचा बळी घेतला आहे. एका दिवसांत दोन हजारांपेक्षा जास्त मृत्यूची नोंद झालेला अमेरिका हा पहिलाच देश अससल्याची माहिती जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या हवाल्यानं एएफफीनं या वृत्तसंस्थेनं दिली आहे. आतापर्यंत अमेरिकत तब्बल १८,७६३ नागरिकांना कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर करोना बाधितांची संख्या ५, ०४, ७८० इतकी झाली आहे

जगातील १९३ देश आणि प्रदेशांमध्ये १६ लाख ४७ हजार ६३५ हून अधिक जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. यापैकी, किमान ३ लाख ६९ हजार ११६ लोक बरे झाल्याचे मानले जात आहे. तर एक लाख २६० जणांचा मृत्यू झाला आहे. जगात महामंदी येणार असल्याचा इशाराही शुक्रवारी जागतिक नाणेनिधीने दिला असून, १७ कोटी अमेरिकींनी नोकऱ्या गमावल्याची आकडेवारी जाहीर झाल्यामुळे करोनामुळे उद्भवणाऱ्या आर्थिक आपत्तीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

स्पेनमध्ये आतापर्यंत १५,८४३ मृत्यू नोंदवण्यात आले असून, तेथे १,५७,०२२ लोकांना करोनाचा संसर्ग झाला आहे. फ्रान्समध्ये १२,२१० करोना बळी, तर १,१७,७४९ करोनाग्रस्त आहेत. याखालोखाल ब्रिटनचा क्रम असून तेथे करोनाने ७९७८ लोकांचे बळी घेतले आहेत, तर ६५,०७७ लोक करोनाबाधित झाले आहेत. ब्रिटनमध्ये गुरुवारी ८८१ जण करोना विषाणूमुळे मृत्युमुखी पडल्यामुळे देशातील बळींची संख्या ८ हजारांवर गेली. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची प्रकृती मात्र सुधारली असून, ३ दिवस अतिदक्षता विभागात राहिल्यानंतर ते बाहेर आले आहेत.