‘जैश- ए- मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव अमेरिकेने संयुक्त राष्ट्रात सादर केला आहे. अमेरिकेच्या या प्रस्तावाला फ्रान्स आणि ब्रिटन या देशांनीही पाठिंबा दिला आहे.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असलेल्या पाकिस्तानच्या जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत केला होता. मात्र, चीनने नकाराधिकार वापरून मसूदचा बचाव केल्याने भारताला धक्का बसला होता. यानंतर आता अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन या देशांनी मसूद अझहरला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मांडला आहे.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकेने मसूद अझहरला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाला ब्रिटन आणि फ्रान्स या देशांनी पाठिंबा दिला आहे. पुलवामा हल्ल्याचा निषेध करत मसूदचा काळ्या यादीत समावेश करावा, असे अमेरिकेने म्हटले आहे. या यादीत यापूर्वी अल- कायदा आणि इस्लामिक स्टेट (आयसिस) यासारख्या दहशतवादी संघटनांचा समावेश होता. काळ्या यादीत समावेश झाल्यास अझहरच्या पाकिस्तानमधील दौरे, आर्थिक व्यवहार आणि मालमत्ता याच्यावर निर्बंध येतील.

दरम्यान, १५ दिवसांपूर्वीच चीनने मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या प्रस्तावात अडथळा आणला होता. अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाच्या अल कायदा निर्बंध समितीपुढे फ्रान्स, अमेरिका आणि ब्रिटन यांनी २७ फेब्रुवारी रोजी मांडला होता. मात्र,या प्रस्तावावर चीन नकाराधिकार वापरून अझरला जागतिक दहशतवादी ठरवण्यात खोडा घातला होता. आता चीन काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.