प्रियांका गांधी या अद्यापही प्रचाराला का उतरल्या नाहीत असा प्रश्न विचारणाऱ्या भाजप नेत्या स्मृती इराणींवर काँग्रेसने टीका केली आहे. प्रियंका गांधी या प्रचार करत आहे की नाही, करणार आहेत की नाही? ही काँग्रेसची बाब आहे, स्मृती इराणींनी आमच्या कामात नाक खुपसू नये असा इशारा काँग्रेस नेते पी. सी. चाको यांनी दिला आहे. उत्तर प्रदेशामध्ये आपल्याला पराभव पत्करावा लागेल या भीतीने प्रियांका गांधी या प्रचारात उतरत नाहीत असे टोमणा स्मृती इराणींना मारला होता. त्याला उत्तर देताना काँग्रेसने स्मृती इराणींवर कडाडून हल्ला केला आहे.

दुसऱ्यांच्या कामात लुडबूड करण्यापेक्षा स्मृती इराणींनी आधी आपल्या आरोपावरील उत्तर द्यावे असे चाको म्हणाले. आधी त्यांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेविषयीचे संभ्रम दूर करावे आणि मग दुसऱ्याचे काय प्रश्न आहेत हे पाहावे. स्मृती इराणी या जेव्हा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री होत्या त्यावेळी त्यांच्याच शैक्षणिक पात्रतेवरुन वाद निर्माण झाला होता. माहितीच्या अधिकार कायद्याखाली विचारण्यात आलेल्या आपल्यासंबंधी प्रश्नांची उत्तरे देणे टाळावीत असा आदेश स्मृती इराणींनी दिला होता. जर त्या इतक्या साध्या प्रश्नांची उत्तरे त्या देऊ शकत नसतील तर त्यांनी राजकारणात राहू नये असे चाको यांनी म्हटले.

दरम्यान, आज राहुल गांधी यांच्यासोबत प्रियांका गांधी या प्रचार करणार असल्याचे काँग्रेस नेत्यांनी सांगितले. राहुल गांधी यांची आज राय बरेली येथे प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत आज प्रियांका गांधी प्रचारात दिसतील असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. प्रियांका गांधींनी प्रचारात उतरावे अशी मागणी काँग्रेस कार्यकर्ते गेल्या कित्येक दिवसांमध्ये करत आहेत. प्रियांका गांधी या केवळ अमेठी आणि रायबरेली या दोन लोकसभा मतदारसंघ क्षेत्रात प्रचार करतील असे याआधी सांगण्यात आले होते. या भागात विधानसभेच्या एकूण १० जागा आहेत. प्रियांका गांधी यांच्याकडे नियोजनाची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यातून त्यांना वेळ मिळणे केवळ अशक्य आहे. उत्तर प्रदेशात सात टप्प्यांत मतदान होत आहे. त्यामुळे हा सारा व्याप सांभाळून त्या प्रचार करतीलच असे नाही असे गुलाम नबी आझाद यांनी म्हटले होते.