उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यात पोलिसांनी एका हत्येच्या धक्कादायक प्रकरणाचा उलगडा केला आहे.  पोलिसांनी मरण पावलेल्या एका व्यक्तीला त्याच्या मुलांच्या आणि पत्नीच्या हत्येप्रकरणी अटक केली आहे. आरोपीने २०१८ मध्ये घरातील तिघांची हत्या केल्यानंतर त्यांचे मृतदेह जमिनीत दफन करून स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला होता. हा मृत व्यक्ती गेल्या तीन वर्षांपासून त्याच्या प्रेयसीसोबत राहत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,३४  वर्षीय राकेश २०१८ मध्ये ग्रेटर नोएडा येथील एका खासगी प्रयोगशाळेत पॅथॉलॉजिस्ट म्हणून काम करत होता. त्याने एका महिलेसोबत असलेल्या प्रेमसंबंधातून आपल्या पत्नी आणि मुलांची हत्या केली होती. एवढंच नव्हे तर स्वतःच्या खोट्या मृत्यूचं बिंग फुटू नये, यासाठी राकेशने ग्रेटर नोएडामध्ये कुटुंबाची हत्या केल्यानंतर दोन महिन्यांनी कासगंजमध्ये त्याच्या एका मित्राचीही हत्या केली, असे पोलिसांनी सांगितले. नोएडा पोलीस आणि कासगंज पोलिसांच्या पथकांनी बुधवारी रात्री उशिरा घटनास्थळावरून जमिनीत दफन केलेल्या मृतदेहाचे अवशेष बाहेर काढून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले.

कासगंज पोलीस प्रमुख रोहन प्रमोद बोत्रे यांनी २०१८ मध्ये घडलेल्या या प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली. त्यानुसार, “राकेशने चार वर्षांपूर्वी त्याच्या कुटुंबीयांच्या आणि मैत्रिणीच्या मदतीने पत्नीसह मुलांची हत्या केली होती. या घटनेची सुरुवात नोएडापासून झाली. त्याने पत्नी आणि तीन वर्षाच्या आणि १८ महिन्याच्या मुलाची हत्या केली. त्यानंतर त्यांचे मृतदेह घरातील सिमेंटच्या खड्ड्यात पुरले. दुसऱ्या दिवशी, तो घरातील तिघेही हरवल्याची तक्रार दाखल करायला गेला पण त्याच्या सासऱ्याला त्याच्यावर संशय आला. त्यांनी घटनेच्या सहा महिन्यांनंतर राकेशवर अपहरण आणि हुंड्यासाठी मुलीचा छळ केल्याचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, या हत्या केल्यानंतर स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचण्यासाठी दोन महिन्यांनी राकेशने पुन्हा आपल्या मैत्रिणीच्या मदतीने त्याचा मित्र कलुआची देखील हत्या केली. त्याने कलुआला दारू पाजून त्याचे डोके आणि हात कापले. त्यानंतर मृतदेहाला स्वतःचे कपडे घातले आणि हा त्याचा मृतदेह आहे, हे भासवण्यासाठी स्वतःचे ओळखपत्र मृतदेहावर सोडले. धक्कादायक म्हणजे या संपूर्ण कटाचा एक भाग म्हणून राकेशच्या कुटुंबाने देखील हा मृतहेद त्याचाच असल्याचा दावा केला होता,  असं पोलिसांनी सांगितलं.

जेव्हा पोलिसांनी मृतदेहाची डीएनए चाचणी केली तेव्हा तो राकेश नसल्याचे उघड झाले आणि नंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात आढळलेल्या पुराव्यांमुळेच पोलीस राकेशपर्यंत पोहोचले. राकेश हा दिलीप शर्मा नावाने प्रेयसीसोबत राहत होता. शिवाय उत्तर प्रदेशच्या कुशीनगर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचं त्याने त्याच्या घरमालकाला सांगितलं होतं. राकेश हा पॅथॉलॉजिस्ट असल्यामुळे त्याला कोणत्याही फिंगरप्रिंटसह पुरावे कसे नष्ट करायचे हे माहित होते, त्यामुळे तो हा बनाव रचण्यात यशस्वी झाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.