पॅरिसवरील हल्ल्यासाठी अमेरिका आणि रशिया या जागतिक महासत्तांची भूतकाळातील कृत्ये कारणीभूत असल्याचे विधान उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांनी केले आहे. विशिष्ट कारणांमुळेच पॅरिसवर हल्ला करण्यात आला. त्यामुळे दहशतवादी कोण हे इतिहासच ठरवेल, असे खान यांनी एका जाहीर कार्यक्रमात सांगितले. आम्ही ज्याप्रमाणे पॅरिसवरील हल्ल्याचा निषेध करतो, त्याचप्रमाणे अमेरिका आणि रशियाकडून आखाती देशांवर करण्यात आलेल्या हल्ल्यांचाही निषेध करतो. इराक, अफगाणिस्तान, लिबिया, सिरिया आणि इराण हे देश या हल्ल्यांमुळे उद्ध्वस्त झाले. निष्पापांना सर्वप्रथम कुणी मारले आणि कोण प्रतिकार करत आहे, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. तुम्ही अशी परिस्थिती निर्माण करत असाल तर त्याच्या विपरीत परिणामांना सामोरे जायची तयारी ठेवली पाहिजे. अमेरिका, रशिया वा अन्य कोणीही असो निष्पापांना मारणे चुकीचे आहे. कोण दहशतवादी आहे आणि कोण नाही, याचा न्याय इतिहासच करेल, असे मत यावेळी आझम खान यांनी मांडले.