लखनऊच्या पासपोर्ट कार्यालयाने तन्वी सेठचा पासपोर्ट रद्द केला आहे. पोलीस तपासात तन्वी सेठने चुकीची माहिती पुरवल्याचं समोर आल्यानंतर पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे. याशिवाय तन्वी सेठ उर्फ सादिका अनस हिचा पती मोहम्मद अनस याचाही पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे. चुकीची माहिती पुरवल्याबद्दल तन्वीला ५ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. दैनिक भास्करच्या आधारे माध्यमांनी याबाबतचं वृत्त दिलं आहे. पासपोर्ट अधिनियमांतर्गत तन्वीविरोधात एफआयआर देखील दाखल होण्याची शक्यता आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तन्वी सेठच्या पासपोर्टची पडताळणी करण्यासाठी पोलीस तन्वी सेठच्या कैसरबाग येथील सासरी पोहोचले. पण तन्वी सेठ लखनऊमध्ये राहत असल्याचे कोणतेही कागदपत्र पोलिसांना मिळालेले नाही. जवळपास दोन तास तेथे थांबून सासरकडील मंडळींशी चर्चा केल्यानंतर पोलिसांचं पथक तेथून रिकाम्या हाती परतलं. नियमानुसार, पासपोर्टसाठी अर्ज करताना दिलेल्या पत्त्यावर एक वर्षाहून जास्त काळ वास्तव्य गरजेचं आहे, यासंबंधी पुरावा पोलिसांना मिळालेला नाही. पण पोलिसांच्या चौकशीत तन्वी गेल्या एका वर्षापासून लखनऊमध्ये नाही तर नोयडामध्ये राहत असल्याचं समोर आलं, त्यामुळे चुकीची माहिती दिल्याच्या आरोपावरुन त्यांचं पासपोर्ट रद्द करण्यात आलं, पोलिसांनी तन्वीच्या मोबाइल कॉल डिटेलद्वारे लोकेशन तपासण्याचाही प्रयत्न केला, पण १४ जूनआधी तन्वीचं लोकेशन नोयडा दाखवलं, अशी माहिती आहे. तन्वीने पासपोर्टसाठी अर्ज करताना गोंडा येथे जन्म झाला आणि कैसरबागमध्ये नाज चित्रपटगृहाजवळ चिकवाली गल्ली झाऊलाल बाजारात राहणाऱ्या अनस याच्याशी लग्न झाल्याचा उल्लेख केला आहे. नोयडामध्ये राहण्याचा उल्लेखही त्यांनी अर्जात केला होता.

काय होतं प्रकरण –
लखनऊमध्ये पासपोर्ट कार्यालयात प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी गेले असताना मोहम्मद अनस सिद्दीकी आणि त्यांची पत्नी तन्वी सेठ यांना पासपोर्ट कार्यालयातील अधिकारी विकास मिश्रा याने पासपोर्ट जारी करण्यास नकार दिला होता. अनस सिद्दीकी यांना आधी धर्मांतर करण्यास त्याने सांगितलं आणि पासपोर्ट देण्यास नकार दिला. इतकंच नाही तर तन्वी यांना सर्व कागदपत्रांवर आपलं नाव बदलण्यासही सांगितलं. जेव्हा त्यांनी नकार दिला तेव्हा त्याने त्यांच्यावर आरडाओरड सुरु केली. या वागणुकीमुळे धक्का बसलेल्या दांपत्याने सुषमा स्वराज यांच्याकडे ट्विटरद्वारे तक्रार करत मध्यस्थी करण्याची मागणी केली होती, प्रकरणातील वाद वाढल्यानंतर त्यांना पासपोर्ट जारी करण्यात आला होता. अनस आणि तन्वी यांचं २००७ मध्ये लग्न झालं आहे. त्यांनी सहा वर्षाची मुलगी आहे. दोघेही नोएडा येथे एका खासगी कंपनीत काम करतात.