News Flash

उत्तर प्रदेश : लंडन रिटर्न डॉक्टरला अडीच कोटींना विकला ‘अल्लादिनचा दिवा’

या दिव्यामधून आपल्याला अनेकदा जिन काढून दाखवण्यात आल्याचंही डॉक्टर म्हणाला

उत्तर प्रदेशमधील मेरठ जिल्ह्यामध्ये करोडो रुपयांच्या फसवणुकीचे एक विचित्र प्रकरण उघडकीस आलं आहे. जिल्ह्यातील दोन व्यक्तींनी स्वत:ला तांत्रिक असल्याने सांगून लंडनवरुन परत आलेल्या एका डॉक्टरला अल्लादिनचा दिवा तब्बल अडीच कोटी रुपयांना विकला. हा दिवा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल असं आश्वासन या तांत्रिकांनी डॉक्टरला दिलं होतं. हा प्रकार जिल्ह्यातील खैरनगरमधील ब्रम्हपुरी पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडला आहे. फसवणूक झालेल्या डॉक्टरचे नाव लकी खान असं असून या प्रकरणी आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार केली आहे.

डॉक्टरने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत दोघांना अटक केली आहे. या दोघांकडून त्यांनी दावा केलेला जादुचा अल्लादिनचा दिवाही जप्त करण्यात आला आहे. २०१८ साली डॉक्टर खानची समीना नावाच्या एका महिलेशी एका शस्त्रक्रियेसंदर्भात भेट झाली. त्यानंतर शस्त्रक्रीया झाल्यावर काही दिवस डॉक्टर मलपट्टी करण्याच्यानिमित्ताने या रुग्णाच्या घरी जात असे. याच महिलेच्या घरी डॉक्टरची ओळख इस्लामुद्दीन नावाच्या व्यक्तीशी झाली. आपण तांत्रिक असल्याचे सांगून आपल्याकडे जादुई शक्ती असल्याचा दावा केला. मी तुला श्रीमंत करु शकतो असं या इस्लामुद्दीनने डॉक्टरला सांगितल्याचं नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

त्यानंतर काही दिवसांनी इस्लामुद्दीन आणि त्याच्या मित्राने डॉक्टरला अल्लादिन का चिराग आणून देऊ असं सांगितलं. या दोघांनी आपल्याला अनेकदा या दिव्यामधून जिन बाहेर आल्याचं दाखवलं. जेव्हा जेव्हा या डॉक्टरने हा दिवा घरी घेऊन जाण्याची इच्छा या दोघांना बोलून दाखवली तेव्हा त्यांनी तू या दिव्याला हात लावला तर काहीतरी वाईट घडेल अशी भीती दाखवल्याचंही तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

मात्र थोडा तपास केल्यानंतर डॉक्टरला त्याला जिन म्हणून दाखवण्यात येणारी व्यक्ती म्हणजे इस्लामुद्दीन असल्याचे समजले. तसेच इस्लामुद्दीन हा डॉक्टरने ज्या महिलेची शस्त्रक्रीया केली त्या महिलेचा पती असल्याचे डॉक्टर खानला समजले. जिन निघणारा हा दिवा या दोघांनी मला विकण्याचं आश्वासन दिलं आणि माझ्याकडून अडीच कोटी रुपये घेतल्याचा आरोप डॉक्टर खानने केला आहे. आपण अडीच कोटींची रक्कम टप्प्याटप्प्यांमध्ये या दोघांना दिल्याचे डॉक्टरचे म्हणणे आहे.

या प्रकरणामध्ये आपली फसवणूक झाल्याचे समजताच डॉक्टरने थेट मेरठच्या पोलीस अधिक्षकांकडे धाव घेत फसवणुक करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी केली. ब्रम्हपुरी सर्कल ऑफिसर अमित राय यांनी या प्रकरणामध्ये दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती दिली आहे. इस्लामुद्दीन आणि त्याचा मित्र अनिसला अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये इस्लामुद्दीनच्या पत्नीचा शोध पोलीस घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2020 4:18 pm

Web Title: up two men cheat london returned doctor sell him aladdin ka chirag for rs two and half cr in meerut scsg 91
Next Stories
1 फ्रान्समध्ये व्यंगचित्राचा वाद भडकला! अल्ला हू अकबरचे नारे देत चाकू हल्ला; तिघांचा मृत्यू
2 बँक, सिलिंडर, रेल्वे… १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ महत्त्वाचे नियम
3 पाकिस्तानचे लष्करप्रमुख बाजवांना का घाम फुटला होता?, माजी एअर फोर्स प्रमुख म्हणाले…
Just Now!
X