प्रख्यात गझलकार आणि गीतकार राहत इंदौरी यांचं निधन झालं आहे. ते ७० वर्षांचे होते. मध्य प्रदेशातील इंदौरमधल्या रुग्णालयात त्यांना रविवारी दाखल करण्यात आलं होतं. त्यांना करोनाची लागण झाली होती. “त्यांना आज दोनदा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली”, अशी माहिती अरविंदो रुग्णालयाचे डॉक्टर विनोद भंडारी यांनी दिली.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर राहत इंदौरी यांनी ट्विट करत सांगितलं होतं, “कोविडची प्राथमिक लक्षणे दिसू लागताच माझी करोना चाचणी करण्यात आली. करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मला अरविंदो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या आजाराचा मी लवकरात लवकर पराभव करावा, अशी प्रार्थना करा. आणखी एक विनंती आहे, मला किंवा माझ्या कुटुंबीयांना फोन करु नका, माझ्या प्रकृतीची माहिती ट्विटर आणि फेसबुकवर मिळेल.”

काही महिन्यांपूर्वी त्यांचा ‘बुलाती है मगर जाने का नहीं’ हा शेर खूप चर्चेत आला होता. सोशल मीडियावर या शेरनं अक्षरशः धुमाकूळचं घातला होता.