रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) गर्व्हनर पदावरून रघुराम राजन पायउतार झाल्यानंतर दोनच दिवसांपूर्वी उर्जित पटेल यांनी पदभार घेतला आहे. पटेल हे आपल्या साधेपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या याच साधेपणामुळे नीती आयोगाच्या अधिकाऱ्यांचा गैरसमज झाला आणि चुकीच्या व्यक्तीला उर्जित पटेल समजून त्यांचे त्याचे ‘आओ भगत’ केले. उशिराने त्यांना आपली चूक लक्षात आली. झालं असं की, मंगळवारी उर्जित पटेल यांनी आरबीआयच्या २४ व्या गर्व्हनरपदाची धुरा आपल्या हाती घेतली. पदभार घेतल्यानंतर त्यांची पहिलीच बैठक ही नीती आयोगाबरोबर होती. त्यावेळी हा सगळा प्रकार घडला.
पटेल यांची नीती आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगढिया यांच्याबरोबर मंगळवारी सांयकाळी बैठक होती. नीती आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी पटेल यांच्या स्वागताची तयारी केली होती. आयोगाचे एक वरिष्ठ अधिकारी पटेल यांची वाट पाहत प्रवेशद्वारावर थांबले होते. पटेल यांच्या आगमनावेळीच एक महागडी कार कार्यालयासमोर आली. संबंधित अधिकाऱ्याला कारमधील व्यक्ती उर्जित पटेल असल्याचे वाटले. त्यांनी लगेचच पुढे येऊन त्यांचे स्वागत केले. पुष्पगुच्छ दिला आणि त्यांना कार्यालयाकडे नेले. त्यानंतर त्या अधिकाऱ्याला आपल्या हातून चूक झाल्याचे लक्षात आले. तोपर्यंत खूप उशिर झाला होता.
त्याचदरम्यान उर्जित पटेल हेही आपल्या कारने नीती आयोगाच्या कार्यालयात पोहोचले. त्यांच्या हातात फाईलींचा गठठा होता. प्रवेशद्वारावर केंद्रीय औद्योगीक सुरक्षा दलाच्या जवानाने त्यांना ओळखले नाही. त्याने लगेच पटेल यांना अडवले व ओळखपत्राची मागणी केली. पटेल यांनी लगेचच त्याला ओळखपत्र दाखवले. ओळखपत्र पाहिल्यानंतरच जवानाने पटेल यांना आत जाऊ दिले.