अन्यथा गंभीर परिणाम भोगण्याचा पाकिस्तानला अमेरिकेचा इशारा

मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याला पुन्हा अटक करून त्याच्यावर खटला भरण्यात यावा अन्यथा पाकिस्तानने द्विपक्षीय संबंधांवर होणाऱ्या परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहावे, असा इशारा अमेरिकेने पुन्हा एकदा दिला आहे. मुंबई हल्ल्याला रविवारी नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. पाकिस्तानने सईदबाबत निर्णायक कारवाई करण्याची अपेक्षा अमेरिकेने व्यक्त केली आहे.

जमात उद दवाचा प्रमुख असलेला सईद याच्यावर अमेरिकेने १ कोटी डॉलर्सचे इनाम लावले आहे. त्याला शुक्रवारी पाकिस्तानने सोडून दिले आहे. त्यावर भारत व अमेरिका या दोन्ही देशांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या वर्षी जानेवारीपासून त्याला नजरकैदेत ठेवण्यात आले होते.

व्हाइट हाऊसच्या प्रसिद्धी सचिव सारा सँडर्स यांनी कडक भाषेत इशारा देताना म्हटले आहे, की अमेरिका सईदच्या सुटकेचा निषेध करीत असून त्याला पुन्हा अटक करून खटला भरण्यात यावा. पाकिस्तानने त्याला पकडून गुन्हा दाखल केला नाही, निष्क्रियता दाखवली तर त्याचे द्विपक्षीय संबंधांवरच नव्हे तर पाकिस्तानच्या जागतिक प्रतिमेवर फार वाईट परिणाम होतील.

सईद याच्यावर खटला दाखल न करता त्याला सोडून देण्याचे कृत्य पाकिस्तानने केले. त्यातून पाकिस्तानचा खरा चेहरा उघड झाला आहे. दहशतवाद्यांना आम्ही संरक्षण देणार नाही हे वचन पाकिस्तानने मोडले असाच त्याचा अर्थ आहे असे सारा सँडर्स यांनी स्पष्ट केले.

सर्व प्रकारच्या दहशतवादाबाबत आपण गंभीर आहोत हे दाखवून देण्याची पाकिस्तानला आता संधी आहे, त्यासाठी त्यांनी सईदला अटक करून त्याच्यावर खटला चालवावा. सईद लष्कर ए तोयबाचा संस्थापक असून, त्याच्या संघटनेने मुंबईत केलेल्या हल्ल्यात काही अमेरिकनांसह निरपराध व्यक्तींचा बळी गेला होता हे पाकिस्तानने विसरू नये असेही त्यांनी सांगितले.

मुंबई हल्ल्याचा सूत्रधार

सईद हा कुख्यात दहशतवादी असून तो नोव्हेंबर २००८च्या मुंबई हल्ल्याचा तो सूत्रधार होता. त्या हल्ल्यात सहा अमेरिकी व्यक्तींसह १६६ जण मारले गेले होते.