बराक ओबामा यांची टीका

वॉशिंग्टन : स्वत:ला आणि स्वत:च्या धनाढय़ मित्रांना मदत करण्यासाठीच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, असा आरोप अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी केला आहे. करोनाचा मुकाबला करण्याची योजना नसल्याबद्दल आणि मुलाखतीमधून काढता पाय घेतल्याबद्दलही ओबामा यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे.

वरील बाब लक्षात घेऊन अमेरिकेतील जनतेने ट्रम्प यांना दुसऱ्यांदा विजयी करू नये, असे आवाहन ओबामा यांनी केले आहे. त्याचप्रमाणे डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडेन आणि उपाध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनाच पाठिंबा द्यावा, असेही ओबामा यांनी म्हटले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेतील नागरिकांबद्दल सहानुभूती नाही, त्यांना नागरिकांची चिंता वाटत नाही, स्वत:ला आणि स्वत:च्या धनाढय़ मित्रांना मदत करण्यासाठीच ते दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, तर दुसरीकडे बायडेन आणि हॅरिस हे स्वत:साठी नव्हे तर तुमच्यासाठी आणि आपल्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, असेही ओबामा यांनी फ्लोरिडातील मियामी येथे एका निवडणूक सभेत स्पष्ट केले.