इराणकडून अमेरिकेच्या लष्करी हवाईतळांवर करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत सगलं काही आलबेल असल्याचं सांगत सूचक वक्तव्य केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटच्या सुरुवातीलाच ऑल इज वेल असं म्हटलं आहे. इराणकडून इराकमधील अमेरिकेच्या लष्करी हवाईतळांवर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला आहे. इराणने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून अमेरिकेकडूनही वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. या हल्ल्यात अमेरिकेचे ३० सैनिक मारले गेल्याचा दावा इराणकडून करण्याता आला आहे.

इराणचा अमेरिकेच्या हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ला; ३० सैनिक मारल्याचा दावा

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “ऑल इज वेल! इराणकडून इराकमधील दोन लष्करी हवाई तळांवर हल्ला करण्यात आला आहे. जीवितहानी आणि नुकसानाची माहिती घेतली जात आहे. आतापर्यंत सगळं काही ठीक आहे. सध्या तरी आमच्याकडे जगातील सर्वात शक्तिशाली आणि सुसज्ज सैन्य आहे. उद्या सकाळी आम्ही यासंबंधी निवेदन जारी करु”.

मागील आठवड्यात अमेरिकेने इराकची राजधानी बगदादमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात इराणचे टॉप कमांडर मेजर जनरल कासिम सुलेमानी ठार झाले होते. कासिम सुलेमानी यांचा ताफा बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेने जात असताना अमेरिकेकडून हवाई हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात कासिम सुलेमानी ठार झाले. कासिम सुलेमानी यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठीच इराणकडून हा हल्ला करण्यात आला आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर अमेरिकेनं आखाती देशात जाणारी वाहतूक रोखण्याचा निर्णय घेतला आहे.