आम्हाला गरज असताना भारताने मदत केली आहे त्यामुळे आता करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संकटात असताना आम्ही भारताला सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणानंतर दिले.

भारताला आपत्कालीन मदतीशिवाय साधनसामुग्रीही पुरवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी व अध्यक्ष बायडेन यांच्यात सोमवारी दूरध्वनी संभाषण झाले होते. करोनाच्या दुसऱ्या साथीत भारत अडचणीत असताना अमेरिका संथ प्रतिसाद देत असल्याची टीका बायडेन प्रशासनावर झाली होती त्यानंतर अमेरिकेने भारताला मदत करण्याची तयारी दर्शवली असून लशीसाठी लागणारे घटक किंवा कच्चा माल पुरवण्याचेही मान्य केले आहे. अमेरिकेची गरज भागल्यानंतरच भारताचा विचार करण्यात येईल अशी भूमिका बायडेन प्रशासनाने या आधी घेतली होती.

‘अ‍ॅस्ट्राझेनेका लशीच्या ६ कोटी कुप्या अमेरिकेकडून जगासाठी उपलब्ध’

सध्या जगात अनेक देशांत करोनाची साथ वाढत असताना त्यावर अ‍ॅस्ट्राझेनेका व ऑक्सफर्ड यांनी तयार केलेल्या लशीच्या ६ कोटी कुप्या अमेरिका जगाला उपलब्ध करून देईल, असे अमेरिकेचे महाशल्यचिकित्सक डॉ. विवेक मूर्ती यांनी म्हटले आहे. अ‍ॅस्ट्राझेनेकाची लस ही जगात मोठ्या प्रमाणात वापरण्यात येत असली तरी तिला अजून अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने मान्यता दिलेली नाही.