पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान भारतासाठी २२ निशस्त्र ड्रोन खरेदीच्या करारावर स्वाक्षरी करणार आहेत. अमेरिका आणि भारत यांच्यात होणाऱ्या या कराराबाबत चर्चा झाली आहे. आता या करारावर स्वाक्षऱ्या होणार आहेत. ज्यामुळे पाकिस्तानची चिंता वाढली आहे. मात्र भारतासोबत होणाऱ्या शस्त्र कराराची पाकिस्तानने चिंता करण्याची गरज नाही असे व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात सैन्याशी संदर्भातही काही करार होणार आहेत. मात्र भारताच्या शेजारी देशांनी यामुळे चिंतेत राहण्याची गरज नाही. हा करार देशांच्या सीमांच्या अंतर्गत होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण होऊ नयेत असेच अमेरिकेला वाटते आहे, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. तसेच भारत आणि पाकिस्तानने आपले परस्पर संबंध सुधारण्यासाठी आपसात चर्चा केली पाहिजे जेणेकरून त्यांच्यातले संबंध सुधारु शकतील असेही या अधिकाऱ्याने म्हटले आहे.

अमेरिका आणि भारत यांच्यात द्विपक्षीय संबंध करार होणार आहे. तसेच २२ ड्रोन खरेदी मंजुरी देणाऱ्या करारावरही स्वाक्षरी होणार आहे. या ड्रोनची निर्मिती जनरल ऑटोमिक्स विभाग करतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीदरम्यान होणारा हा करार, जगाच्या दृष्टीने ‘गेमचेंजर’ मानला जातो आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यापासून पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर जात आहेत. त्यात ड्रोन खरेदीचा करार सर्वात महत्त्वाचा मानला जातोय. हा सौदा साधारण १३० ते १९४ अरब डॉलर्सचा असणार आहे. त्यामुळे पाकिस्तानची डोकेदुखी वाढणे साहजिक होते. मात्र अमेरिकेने पाकिस्तानला काही अंशी दिलासाच दिला आहे.