राज्य सरकार करोनाशी लढा देत असताना जीव धोक्यात घालून रस्त्यांवर बंदोबस्त करणाऱ्या पोलिसांसाठी उत्तर प्रदेश सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलिसांना ५० लाखांचा विमा देण्याची घोषणी केली आहे. लवकरच यासंबंधी आदेश जारी केला जाणार आहे. अतिरिक्त मुख्य सचिव अविनाश अवस्थी यांनी ही माहिती दिली आहे.

अविनाश अवस्थी यांनी माहिती देताना, मुख्यमंत्री कार्यालयाकडून यासंबंधी लवकरच लिखीत आदेश जारी केला जाणार असल्याचं सांगितलं आहे. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही मास्क वापरण्याचे निर्देश दिले आहेत. मास्क घातलेलं नसल्यास त्यांना रोखण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांना लोकांना खोट्या पोस्ट शेअर करु नका असं आवाहन केलं.

दुसरीकडे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी मंगळवारी आदेश देताना जिल्ह्यात करोनाची चाचणी करण्यासाठी कलेक्शन सेंटर स्थापले जाणार असल्याचं सांगितलं. तसंच सहा ठिकाणी टेस्टिंग लॅब सुरु कऱणार असल्याची माहिती दिली. याआधी पंजाब पोलिसांनी पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ५० लाखांचं विमा संरक्षण देत असल्याचं जाहीर केलं होतं. उत्तर प्रदेशात सध्या ३०५ करोनाचे रुग्ण असून तिघांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान भारतात गेल्या २४ तासात करोनाचे ७७३ नवे रुग्ण आढळले असून ३५ मृत्यूंची नोंद झाली आहे. भारतातील करोनाबाधितांची संख्या ५१९४ वर पोहोचली आहेत. तर मृतांची संख्या १४९ झाली आहे. ४०१ जणांवर उपचार करुन त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे.