उत्तर प्रदेशमधील गाझीयाबाद येथे असलेल्या करोनाच्या काही संशयित तबलिगींनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तन आणि अश्लील कृत्य केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली होती. या घटनेची गंभीर दखल घेत यामध्ये सामिल असलेल्या तबलिगींविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली.

“हे ना कायद्याला मानतील, ना प्रशासनाला मानतील. हे सर्व मानवतेचे शत्रू आहेत. त्यांनी महिला आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत जे वर्तन केलं तो एक गंभीर गुन्हा आहे. त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल. आम्ही त्यांना सोडणार नाही,” असा कठोर इशारा योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे. “आपण करोनाविरोधातही खंबीरपणे लढून ही लढाई जिंकू. आपल्या लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या पुढे येणाऱ्या सर्व आव्हानांसाठी तयार राहिलं पाहिजे. लॅब आणि पायाभूत सुविधाही योग्यरित्या सुरू ठेवल्या पाहिजेत,” असंही त्यांनी नमूद केलं.

काय आहे प्रकरण?
रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या करोना संशयित तबलिगी गैरवर्तन करत असल्याची माहिती रूग्णलालयाचे सीएमएलएस रविंद्र राणा यांनी दिली होती. ते सतत या ठिकाणी अश्लील कृत्य करत आहेत. तसंच रूग्णालयाच्या कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तनही करत आहेत. छोट्या छोट्या गोष्टींवरून ते मोठा गोंधळ घालतात. इतकंच काय तर उपचारासाठी आलेल्या परिचारिंकासमोरही कपडे बदलण्यासारखे प्रकार करत आहेत, असंही त्यांनी म्हटलं होतं.