उत्तर प्रदेशची सत्ता मिळवल्यानंतर भाजपची राज्य कार्यकारिणीची बैठक आज झाली. राज्यात विजय मिळवल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते अधिक नम्र झाले, अशा शब्दांत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक केले. भाजप फक्त लोकांची टोळी नव्हे तर देशभक्तांची संघटना आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. देशातील ६० टक्के भागावर भाजपने वर्चस्व मिळवले आहे. त्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिवस-रात्र मेहनत घेतली, असेही शहा म्हणाले.

भाजप देशभक्त कार्यकर्त्यांची संघटना आहे आणि लोकसभा निवडणुकांत मोदी लाटेत भाजपला उत्तर प्रदेशात तब्बल ७३ जागा जिंकता आल्या, असे अमित शहा यावेळी म्हणाले. सद्यस्थितीत भाजपचे ११ कोटी सदस्य आहेत. आम्ही सत्ता स्थापण्यासाठी पक्ष चालवत नाही, अशी माहितीही त्यांनी दिली. बूथवर तैनात असलेल्या तळागाळातील कार्यकर्त्यांना नमन करण्यासाठी आलो आहे. भाजप ११ कोटी सदस्यांसह देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. आताही जे लोक पक्षाशी जोडले गेले नाहीत त्यांना पक्षाशी जोडायला हवे, असेही शहा म्हणाले. उत्तर प्रदेशातील जनतेने आम्हाला ३२५ जागा जिंकून दिल्या आहेत. त्यामुळे सरकारने चांगले काम करावे. ही जबाबदारी भाजपची आहे. आपण समाजवादी पक्ष अथवा बसपचे कार्यकर्ते नाहीत. केवळ राजकीय दबदबा निर्माण करण्यासाठी आपल्याला काम करायचे नाही, असा टोलाही अमित शहा यांनी यावेळी लगावला. राज्यात भाजपची सत्ता आली आहे. त्यामुळे आपल्याला अधिक नम्रतेने काम करायला हवे. जनतेने परिवर्तनासाठी आपल्याला मते दिली आहे. हे परिवर्तन आपले नेते, कार्यकर्त्यांसाठी नव्हे; तर व्यवस्थेच्या परिवर्तनासाठी आहे, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

दहा सदस्य असलेला भाजप सध्याच्या घडीला जगातील सर्वात जास्त सदस्य असलेला पक्ष आहे. केंद्रात भाजपची सत्ता असून, देशातील १७ राज्यांत पक्ष सत्तेत आहे, असे शहा यांनी सांगितले. जय-पराजय होतच असतात. पण प्रसंगी पक्षाच्या सोबत उभे राहायला हवे. आम्ही भाजपच्या यात्रेचे नाव विजय नाही तर परिवर्तन यात्रा ठेवले होते. याचाच अर्थ असा की सत्ताच नव्हे तर व्यवस्थेतही परिवर्तन व्हायला हवे. भाजपचा कार्यकर्ता विनम्रतेने सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे, असेही ते म्हणाले. येथील जातीवाद आणि कौटुंबिक वादाचे राज्य संपले आहे, असा टोलाही त्यांनी समाजवादी पक्षाच्या नेत्यांना लगावला.