उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीआधी होणाऱ्या पंचायत निवडणुकांमध्ये अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी म्हणजेच आप आणि असदुद्दीन ओवेसीं ऑल इंडिया इजलिम-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच एमआयएमआयएमने उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. असं असतानाच आता महाराष्ट्रामधील महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असणाऱ्या शिवसेनेनेही या निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. विधानसभा निवडणुकांच्या आधीच्या महत्वपूर्ण निवडणुका म्हणून पंचायत निवडणुकांकडे पाहिले जात आहे. या निवडणुका मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये होणार आहे. मात्र यासाठी अनेक राजकीय पक्ष आतापासूनच तयारीला लागलेत.

शिवसेनेचे उत्तर प्रदेशमधील राज्य प्रमुख असणाऱ्या अनिल सिंह यांनी पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय आढावा घेऊन पक्ष प्रभारींची नेमणूक केली जात असल्याची माहिती दिल्याचे वृत्त एबीपी न्यूजने दिलं आहे. सर्व जिल्ह्यांमधून प्रभारी पदासाठी अर्ज येत असल्याचेही सिंह यांनी स्पष्ट केलं. याचबरोबरच शिवसेनेचे उत्तर प्रदेशमधील प्रतिनिधीमंडळ महाराष्ट्रामध्ये येऊन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याचे समजते. या भेटीमध्ये राज्यामध्ये पक्षाची तयारी कशी सुरु आहे यासंदर्भातील माहिती वरिष्ठांना देण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशमधील पदाधिकाऱ्यांना निवडणुकांसंदर्भातील मार्गदर्शनासाठी महाराष्ट्रामध्ये पाठवण्याचीही तयारी सुरु करण्यात आली आहे. एक आठवडा या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केलं जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई महानगरपालिका तसेच इतर महानगरपालिका आणि ग्रामीण भागांमध्ये शिवसेना कसं काम करते हे या पदाधिकाऱ्यांना दाखवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील या दौऱ्यानंतर या पदाधिकाऱ्यांना पुन्हा पूर्वांचल आणि पश्चिम बुंदेलखंडमध्ये प्रशिक्षण दिलं जाईल. त्यानंतर यामधूनच उमेदवार निवडण्यात येतील आणि त्यांना पक्षाकडून तिकीट दिलं जाईल. दरम्यानच्या काळामध्ये काँग्रेससोबतची चर्चा यशस्वी झाली आणि एकत्रपणे निवडणुका लढवण्याचा निर्णय झाल्यास पदाधिकारी तशापद्धतीने काम करतील अशी शिवसेनेची योजना आहे.

अनिल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण राज्यामध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते चांगलं काम करत आहे. मागील निवडणुकींमध्ये १६ ग्रामपंचायत सदस्यांबरोबरच अन्य काही ठिकाणी पक्षाला चांगलं यश मिळाल्याचं आकडेवारीवरुन दिसून येत असल्याचं सिंह म्हणाले. काँग्रेससोबत युती करुन निवडणुका लढवता येईल या संदर्भात चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत १६ जानेवारी रोजी उत्तर प्रदेशला जाणार आहेत. त्यावेळेस राज्यातील नेत्यांसोबत त्यांची बैठक होईल. या बैठकीमध्ये युतीसंदर्भातील निर्णय घेतला जाणार आहे.