उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्याही पक्षासमवेत आघाडी करण्याची शक्यता सपाचे नेते मुलायमसिंह यादव यांनी फेटाळल्यानंतर राष्ट्रीय लोकदल, जद(यू) आणि स्थानिक बीएस-४ या पक्षांनी आघाडी करीत असल्याचे सोमवारी जाहीर केले.

आरएलडीचे नेते अजितसिंह, जद(यू) नेते शरद यादव आणि बीएस-४चे नेते बचनसिंह यादव यांनी सोमवारी संयुक्त पत्रकार परिषदेत आघाडीची घोषणा केली असून ही आघाडी सर्वच्या सर्व म्हणजे ४०३ जागा लढविणार आहे. या आघाडीचे अद्याप नामकरण करण्यात आलेले नाही, मात्र ही प्रामाणिक आघाडी असेल, सध्या तीन पक्षांची आघाडी करण्यात आली असली तरी अन्य छोटय़ा पक्षांसमवेत चर्चा सुरू आहे, असे या नेत्यांनी सांगितले.

या वेळी मुलायमसिंह यांच्यावर हल्ला चढविताना अजितसिंह म्हणाले की, बिहार विधानसभा निवडणुकीच्या वेळी सर्व लोहियावादी आणि चरणसिंहवादी पक्षांनी सपाशी आघाडी करण्याचे मान्य केले होते, मात्र सपाने त्यानंतर नकार दिला. सपासमवेत आघाडीची चर्चा सुरू होती तेव्हा मुलायमसिंह विलीनीकरणाबाबत बोलत होते. मुलायमसिंह यांना जातीय शक्तिंविरोधात कोणतीही आघाडी का नको आहे, असा आश्चर्ययुक्त सवाल अजितसिंह यांनी केला.

दीर्घकाळासाठी आम्ही ऐक्याचे प्रयत्न करीत होतो आणि मुलायमसिंह यांना नेता मानले होते, मात्र त्यामध्ये यश आले नाही, असे शरद यादव म्हणाले.