उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाला मोठा हादरा बसला असून पक्षाच्या दोन आमदारांनी शनिवारी राजीनामा दिला. राष्ट्रीय शिया समाजचे संस्थापक बुक्कल नवाब यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक करत समाजवादीला रामराम ठोकला आहे. त्यांच्यासोबत आमदार यशवंत सिंह यांनीदेखील पक्षाला अलविदा केला आहे.

भाजपाध्यक्ष अमित शहा हे शनिवारपासून उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह राज्यातील पदाधिकाऱ्यांसोबत ते बैठक घेणार आहेत. अमित शहांचा दौरा सुरु होत असतानाच समाजवादी पक्षाच्या दोन आमदारांनी राजीनामा दिला. विधान परिषदेतील आमदार बुक्कल नवाब आणि यशवंत सिंह या दोघांनी राजीनामा दिला असून त्यांनी विधान परिषदेच्या सभापतींकडे राजीनामा दिल्याचे सूत्रांनी सांगितले. बुक्कल नवाब यांनी राजीनामा दिल्यावर समाजवादी पक्षावर टीका केली. समाजवादी पक्षाचे नाव बदलून समाजवादी आखाडा असे ठेवले पाहिजे. या पक्षात अंतर्गत कलह शिगेला पोहोचला असून जो मुलगा वडिलांचा होऊ शकत नाही तो जनतेचा कसा होईल अशा शब्दात त्यांनी अखिलेश यादव यांच्यावर टीकास्त्र सोडले.

विशेष म्हणजे समाजवादीवर टीका करतानाच बुक्कल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले. योगी आदित्यनाथ राज्यात चांगले काम करत असून त्यांच्या कार्यकाळात अजून एकही घोटाळा झालेला नाही असे त्यांनी सांगितले. नवाब आणि यशवंत सिंह हे दोघेही भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. ‘समाजवादी पक्षातील अनेक आमदार नाराज असून तेदेखील पक्ष सोडण्याच्या तयारीत आहे’ असा दावाही बुक्कल यांनी केला. दोन आमदारांनी राजीनामा का दिला हे आता अखिलेश यादवच सांगू शकतील असा टोला भाजप नेते आणि उत्तर प्रदेशमधील सिद्धार्थनाथ सिंह यांनी लगावला. बहुजन समाज पक्षाचे ठाकूर जयवीरसिंह यांनीदेखील पक्षाचा राजीनामा दिला असून विधानपरिषदेतील एकूण तीन आमदारांनी राजीनामाला दिला आहे.