समाजवादी पक्षाला सोमवारी हादरा बसला असून पक्षाचे नेते नरेश अग्रवाल यांनी भाजपात प्रवेश केला. सिनेसृष्टीतील एका अभिनेत्रीला राज्यसभेची उमेदवारी देण्यात आल्याचे सांगत त्यांनी समाजवादी पक्षावर नाराजी व्यक्ती केली. मी राज्यसभेच्या उमेदवारीसाठी भाजपात प्रवेश केलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यसभेतील उत्तर प्रदेशमधील जागेसाठी समाजवादी पक्षाने जय्या बच्चन यांना उमेदवारी दिली.  नरेश अग्रवाल यांना डावलून समाजवादी पक्षाकडून जया बच्चन यांना उमेदवारी देण्यात आली होती. जया बच्चन यांच्या उमेदवारीसाठी शिवपाल यादव यांनी मोर्चेबांधणी केली होती. त्यामुळे नरेश अग्रवाल नाराज होते. अखेर त्यांनी सोमवारी समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला.

दिल्लीत रेल्वेमंत्री पियूष गोयल व अन्य भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत अग्रवाल यांनी भाजपात प्रवेश केला. यानंतर पत्रकारांशी बोलताना गोयल नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, मला एका अभिनेत्रीच्या रांगेत नेऊन बसवले. माझे तिकीट कापण्यात आले. मला ते अयोग्य वाटले, भाजपात प्रवेश करताना माझी कोणतीही अट नव्हती. मी राज्यसभेचे तिकीट मागितलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. जानेवारीमध्ये नरेश अग्रवाल यांनी दिल्लीत गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर अग्रवाल हे भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरु झाली होती.