उत्तराखंडमधील डेहराडून येथे पाच अल्पवयीन मुलांनी आठ वर्षांच्या चिमुरडीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाचही आरोपी हे ९ ते १४ वर्ष वयोगटातील असून त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

डेहराडूनमधील साहसपूर येथे राहणाऱ्या आठ वर्षांच्या मुलीवर तिच्याच परिसरात राहणाऱ्या पाच मुलांनी शुक्रवारी सामूहिक बलात्कार केला. शुक्रवारी पीडित मुलगी घराबाहेर खेळत होती. यादरम्यान एका मुलाने तिला गाठले. खेळण्याच्या बहाण्याने त्याने मुलीला मित्राच्या घरी नेले. तिथे पाच मुलांनी मिळून मुलीवर बलात्कार केला.
‘पीडित मुलगी दुपारी घरी एकटीच असते हे त्या मुलांना माहिती होते. यानुसारच त्यांनी हा कट रचला’, असे पोलीस निरीक्षक नरेश राठोड यांनी सांगितले. मुलांनी घटनेच्या दोन दिवस आधी पॉर्न बघितले होते. ते बघूनच या मुलांनी बलात्कार करण्याचे ठरवले, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. अल्पवयीन आरोपींविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने डेहराडूनमध्ये खळबळ उडाली आहे.