भारत सध्या महत्वाच्या सामाजिक आणि आर्थिक बदलातून जात आहे. त्यानंतर निर्माण झालेला नवा भारत हा जागतिक विकासासाठी उत्प्रेरक ठरेल, असे भाकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. उत्तराखंड इव्हेस्टर्स समिटमध्ये रविवारी ते बोलत होते.

अमेरिकेकडून ‘चॅम्पिअन्स ऑफ द अर्थ’ हा पुरस्कार जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या समिटमध्ये आपले विचार मांडले. ते म्हणाले, नव्याने वापरण्यात येणाऱ्या ऊर्जा क्षेत्रासाठी भारत जागतिक नेतृत्वाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्याचबरोबर २०३० पर्यंत देशातील ४० टक्के ऊर्जा ही बिगर जीवाश्म इंधन स्त्रोतापासून तयार होईल, असे आम्ही निश्चित केले आहे.

मोदी म्हणाले, जगातील प्रत्येक महत्वाच्या संस्थांनी हे भाकीत केले आहे की, येत्या दशकांमध्ये भारत जगाच्या विस्तारामध्ये इंजिन म्हणून काम करेल. भारताची अर्थव्यवस्था गेल्या काही वर्षांपासून स्थिर असून आर्थिक तूट कमी झाली आहे. महागाई नियंत्रणात असून देशातील मध्यमवर्गाची स्थिती सुधारत आहे.

उत्तराखंडबाबत बोलताना मोदी म्हणाले, राज्याकडे सेंद्रीय राज्य म्हणून विकसित होण्याची क्षमता आहे. त्यासाठी जे काम सुरु करण्यात आले आहे ते क्लस्टर बेस्ड सेंद्रिय शेती असे आहे. येथे निसर्ग, थरार, संस्कृती, योग आणि ध्यान अशा सर्व गोष्टी आहेत. त्यामुळे उत्तराखंड टुरिझम हे संपूर्ण पॅकेज आणि आदर्श ठिकाण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, ‘मेक इन इंडिया’ हे केवळ भारतासाठी नसून ही मोहिम संपूर्ण जगासाठी असल्याचे यावेळी मोदींनी गुंतवणूकदारांसमोर बोलताना सांगितले. या दोन दिवसीय समिटमध्ये जपान, चेक रिपब्लिक, अर्जेटिना, मॉरिशस आणि नेपाळ देशाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. सोमवारी या समिटची सांगता होणार असून यावेळी गृहमंत्री राजनाथ सिंह याचे अध्यक्षपद भुषवतील.