देशात आतापर्यंत १०.५ लाख लाभार्थ्यांना करोना प्रतिबंधक लस  देण्यात आली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले. गेल्या २३ तासांत २ लाख ३७ हजार ५० जणांना ४०४९ ठिकाणी लस देण्यात आली. एकूण १८ हजार १६७ लसीकरण सत्रे आतापर्यंत झाली आहेत.

भारताने चाचण्यांमध्येही आघाडी घेतली असून चाचण्यांची संख्या वाढतच आहे. पायाभूत सुविधा विस्ताराचा फायदा भारतातील करोना साथ आटोक्यात ठेवण्यासाठी झाला असून आतापर्यंत १९ कोटी लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण ८,००,२४२ नमुन्यांच्या चाचण्या २४ तासांत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे चाचण्या करण्यात आलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १९ कोटी १ लाख ४८ हजार २४ झाली आहे. र्सवकष व अनेक ठिकाणी चाचण्या करण्यात आल्याने कोविड संसर्ग दर कमी झाला असून आवर्ती सकारात्मकता दर ५.५९ टक्के झाला आहे. गेल्या काही आठवडय़ात एकूण रुग्णांचे प्रमाण १.७८ टक्क्य़ांपर्यंत खाली आले असून भारतातील एकूण उपचार घेणारे रुग्ण १,८८,६८८ झाले असून १८,००२ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे दिवसभरात उपचार घेत असलेल्या रुग्णांचे प्रमाण ३६३० ने कमी झाले आहे.

देशात दिवसभरात १५,५४५ बाधित

देशात गेल्या २४ तासात आणखी १४ हजार ५४५ जणांना करोनाची लागण झाल्याने देशातील करोनाबाधितांची संख्या एक कोटी, सहा लाख २५ हजार ४२८ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत एक कोटी, दोन लाख, ८३ हजार ७०८ जण करोनातून बरे झाले आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.