महाराष्ट्रासोबतच इतर काही राज्यांनी केंद्र सरकारकडे लसींचा पुरेसा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. त्यापाठोपाठ केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी महाराष्ट्र सरकारवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. दुसरीकडे राज्य सरकारकडून देखील हे आरोप फेटाळले जात आहेत. त्यावर आता केंद्रीय माहिती व दूरसंचार मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारला सुनावलं आहे. “महाराष्ट्रात ५ लाख डोस तर वाया गेले. कारण नियोजनच व्यवस्थित केलं जात नाही, एका वायलमध्ये १० लोकांना डोस दिला जातो. त्याचं व्यवस्थित नियोजन केलं जायला हवं. राज्य सरकार आपलं काम नीट करत नाही आणि दुसऱ्यांवर दोष देत आहे. हे म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाँटे अशी स्थिती आहे”, असं प्रकाश जावडेकर म्हणाले आहेत. “कुठेही ३ ते ४ दिवसांचा साठा नेहमी असतोच. त्यापुढे तो येतच असतो. जेवढं तुम्ही लसीकरण करता, त्यापेक्षा जास्त डोस केंद्र सरकार देत असते”, असं देखील ते म्हणाले.

महाराष्ट्रात ५ ते ६ दिवसांचा साठा!

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसींचा पुरवठा कमी असल्याची तक्रार केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश जावडेकरांनी मात्र, राज्याकडे आजही ५ ते ६ दिवसांचा लसींचा साठा शिल्लक असल्याचा दावा केला आहे. “महाराष्ट्रात सरकारकडे आज सकाळपर्यंत २३ लाख लसीचे डोस आहेत. दिवसाला ६ लाख लावले, तरी त्याच्यापेक्षा जास्त दुसऱ्या दिवशी येतात. ३-३ दिवसांचे डोस पाईपलाईनमध्ये असतात. २३ लाख म्हणजे ५ ते ६ दिवसांचा स्टॉक आहे. आता तिथून जिल्ह्यांमध्ये ते वितरीत करणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. केंद्र सरकारकडून राज्यांच्या मागणीप्रमाणे पुरवठा दिला जातो. काल जेवढा पुरवठा असेल, त्याहून जास्त आज दिला जातो. आज जेवढा दिला, त्याहून जास्त उद्या मंजूर होईल. अशी पद्धत आहे”, असं जावडेकर म्हणाले आहेत.

“महाराष्ट्राला उत्तर प्रदेशपेक्षाही जास्त लसी मिळाल्या आहेत”; फडणवीसांचं ठाकरे सरकारला उत्तर

राजेश टोपेंनी दिली तुलनात्मक आकडेवारी

आज सकाळीच महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्राला मिळणारे लसीचे डोस आणि इतर राज्यांना मिळणारे डोस यांची तुलनात्मक आकडेवारी पत्रकार परिषद घेऊन देत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. “केंद्र सरकारने १५ एप्रिलनंतर मिळणारा स्टॉक आठवड्यासाठी १७ लाख केला आहे. पण तो देखील कमीच आहे असं आमचं म्हणणं आहे. उत्तर प्रदेश ४८ लाख, मध्य प्रदेश ४० लाख, गुजरातला ३० लाख, हरियाणाला २४ लाख अशा पद्धतीने लसींचं वाटप झालं आहे. आमची मागणी आठवड्याला ४० लाखांची आहे. आमचा केंद्रबिंदू हा नेहमीच आपला रुग्ण आहे”, असं म्हणत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्राला प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे असणाऱ्या अॅक्टिव्ह रुग्णांच्या प्रमाणानुार लसींचे डोस पुरवले जावेत, अशी मागणी केली आहे.

 

“महाराष्ट्रावर अन्याय का?” वाचा राजेश टोपेंनी काय केलेत केंद्र सरकारवर आरोप!