अभिनेत्री कंगना रणौत विरुद्ध शिवसेना या वादामध्ये कंगनाची बाजू घेणाऱ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने आता हा मुद्दा निवडणुकीसाठी वापरण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र दिसत आहे. कंगनाच्या कार्यालयावर मुंबई महानगर पालिकेने कारवाई केल्यानंतर केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी कंगनाची भेट घेतील होती. याच भेटीचे फोटो आता गुजरातमधील पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी पोस्टवर छापले आहेत. बडोद्यात हे पोस्टर लावण्यात आले आहेत. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

बडोद्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी अभिनेत्री कंगना रणौत आणि पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांचे फोटो असणारे पोस्टर शहरभर लावले आहेत. यासंदर्भात एएनआयशी संवाद साधताना पक्षाचे जिल्हाध्यक्षांनी अशाप्रकारचे पोस्टर संपूर्ण राज्यात लावले जातील असं म्हटलं आहे. “संपूर्ण राज्यात आम्ही असे पोस्टर लावणार आहोत. आम्ही कंगनाचे समर्थन करतो हे दाखवण्यासाठी हे पोस्टर लावण्यात येणार आहेत. आम्ही बडोद्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत,” असं पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी म्हटलं आहे.

आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी लावलेल्या पोस्टरमध्ये कंगना आणि आठवले यांच्या भेटीदरम्यानचा फोटो पोस्टरच्या मध्यभागी छापण्यात आला आहे. ‘कंगना तुम मत डरो, आरपीआय तुम्हारे साथ है’, अशी ओळही या पोस्टरवर लिहिण्यात आली आहे. त्याचबरोबर काही स्थानिक नेत्यांचे फोटोही या पोस्टवर दिसत आहेत. पोस्टरच्या मथळ्यावरच मिशन २०२० व्हीएमसी इलेक्शन असं लिहिण्यात आलं असून महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही पोस्टरबाजी करण्यात आली आहे.

या पोस्टर्सच्या माध्यमातून कंगनाचा मुद्दा आता आरपीआयने थेट महानगरपालिका निवडणुकीसाठी वापरण्याची तयारी सुरु केल्याचे चित्र दिसत आहे.