गांधीनगर येथे सुरू असलेल्या ७व्या ‘व्हायब्रंट गुजरात’ परिषदेत रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या विकासासंदर्भात अनेक महत्त्त्वाच्या विषयांवर भाष्य केले. यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक उद्योगपती, संयुक्त राष्ट्रांचे महासचिव बान की-मुन आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी उपस्थित होते.
आगामी काळात भारताला जागतिक उत्पादनाचे केंद्र बनविण्याच्या दृष्टीने सरकार मेहनत करेल , असे मोदींनी यावेळी सांगितले. केंद्र आणि राज्य पातळीवर उद्योगांच्या सोयीसाठी एक खिडकी योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. उद्योगांसाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सरकार पीपीपी योजनेचा मोठ्या प्रमाणावर अवलंब करेल. याशिवाय, देशात आंतरराष्ट्रीय दर्जाची बंदरे उभारण्यासाठी सागरमाला प्रकल्पही हाती घेण्यात आल्याचे त्यांनी उद्योजकांना सांगितले.

भारत उद्योगांसाठी कशाप्रकारे अनुकूल आहे, हे पटवून देताना मोदींनी केलेल्या भाषणातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे:

* सरकारचे करधोरण आगामी काळात स्थिर राहील.
* उद्योगांसाठी जमीन उपलब्ध व्हावी, यासाठी आम्ही कायद्यात सुधारणा केल्या आहेत. यामुळे दुर्गम भागात आणि शेतकऱ्यांना विकासाचा फायदा मिळू शकतो.
* महत्त्त्वपूर्ण नैसर्गिक स्त्रोतांचा पुरवठा करण्यासाठी सरकारने उपाययोजन केल्या आहेत.
* परदेशी गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूकीची प्रचंड संधी आहे. त्यादृष्टीने आम्ही जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याचा प्रयत्न करू.
* भारताने फार कमी काळात मोठी झेप घेतली आहे. देशातील वातावरण झपाट्याने बदलत असून येथील लोक फार वेगाने ज्ञान आत्मसात करत आहेत.
* भारत नवीन संकल्पना, गुंतवणूक आणि संशोधनाचे स्वागत करायला तयार आहे. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी सरकारने स्वत:शी आणि देशवासीयांशी कटिबद्ध आहे.
* उद्योगांना मदत करण्यासाठी सरकार सदैव तत्पर राहील.
* तुम्ही एक पाऊल पुढे टाका, आम्ही दोन पाऊले पुढे येऊ.
* आम्ही भारतासाठी खूप मोठी स्वप्ने बघितली आहेत. आमची हीच स्वप्ने तुमच्या विकासाची भूमी असेल.

यावेळी रिलायन्स उद्योगसमुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी आगामी एक वर्षाच्या काळात एक लाख कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले. पेट्रोकेमिकल आणि फोर जी क्षेत्रात ही गुंतवणूक करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. नरेंद्र मोदींच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘डिजिटल इंडिया’ या अभियानांच्यादृष्टीने आम्ही आमच्यापरीने योगदान देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही अंबांनी यांनी यावेळी सांगितले.