व्हिडीओफीत बनावट नसल्याचा भाजप प्रदेशाध्यक्षांचा दावा

रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली त्याबद्दल माकपचे कार्यकर्ते आनंद व्यक्त करीत असल्याबद्दल आपण जारी केलेली व्हिडीओफीत बनावट नसल्याचा दावा केरळ भाजपचे प्रमुख के. राजशेखरन यांनी मंगळवारी केला आणि आपल्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे आव्हानही त्यांनी राज्य सरकारला दिले.

राज्य सरकारने या प्रकरणाची खातरजमा करावी आणि आपल्याविरुद्ध गुन्हा नोंदवावा, असे राजशेखरन यांनी कोची येथे वार्ताहरांना सांगितले. संघाचा कार्यकर्ता विजू याची हत्या करण्यात आली त्याबद्दल माकपने राज्यात किमान १४ ठिकाणी आनंद व्यक्त केला, असेही राजशेखरन म्हणाले. केरळमध्ये जंगल राज असल्याचा व्हिडीओ राजशेखरन यांनी समाजमाध्यमांवर टाकला होता. संघ कार्यकर्त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली आणि त्याचा आनंद साजरा करण्यात आला, असा मजकूरही त्या व्हिडीओमध्ये होता.

दरम्यान, या व्हिडीओबाबत तपास करून त्याची सत्यता पडताळून पाहण्याचे आदेश केरळचे पोलीस महासंचालक टी. पी. सेनकुमार यांनी कन्नूरच्या पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. व्हिडीओ फीत जारी करून राजशेखरन हिंसाचार घडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप माकपचे चिटणीस के. बालकृष्णन यांनी केला आहे. यूडीएफच्या राजवटीत माकपच्या २७ कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली, मात्र तेव्हा भाजपने सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा लागू करण्याची मागणी केली नाही, असे बालकृष्णन म्हणाले.