भारतीय बँकांचे ९ हजार कोटी रुपये थकवून ब्रिटनमध्ये पळून गेलेल्या विजय मल्ल्याच्या वकिलांनी भारतीय न्यायव्यवस्थेच्या तटस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भारतीय न्यायव्यवस्था, सर्वोच्च न्यायालय आणि प्रसारमाध्यमे निष्पक्ष नसल्याचे माल्ल्याच्या वकिलांनी म्हटले आहे. भारतापेक्षा पाकिस्तानमधील न्यायाधीश अधिक तटस्थ आहेत, असेही मल्ल्याचे वकील क्लारे मॉन्टगोमरी आणि डॉ. मार्टिन लाऊ यांनी वेस्टमिन्स्टर न्यायालयाला सांगितले.

विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताचे प्रयत्न सुरु आहेत. याबद्दल लंडनच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयात सुनावणी सुरु आहे. यावेळी मल्ल्याच्या वकिलांनी त्याची बाजू न्यायाधीशांसमोर मांडली. ‘पाकिस्तानमधील न्यायाधीश भारतीय न्यायाधीशांपेक्षा जास्त तटस्थ असतात,’ असे माल्ल्याचे वकील क्लारे मॉन्टगोमरी आणि डॉ. मार्टिन लाऊ यांनी न्यायाधीशांना सांगितले. यासोबतच मल्ल्याच्या वकिलांनी भारतीय न्यायव्यवस्था, न्यायाधीश आणि प्रसारमाध्यमांच्या निष्पक्षतेवरही प्रश्न उपस्थित केले. मल्ल्याने देशातील विविध बँकांचे ९ हजार कोटी रुपये थकवले आहेत. त्याच्यावर कर्जाची रक्कम थकवणे, फसवणूक करणे असे आरोप आहेत. भारतातून पळून गेलेला मल्ल्या सध्या लंडनमध्ये आहे.

मल्ल्याचे वकील क्लारे मॉन्टगोमरी आणि डॉ. मार्टिन लाऊ लंडनमधील साऊथ एशियन लॉ इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक आहेत. या वकिलांनी मल्ल्याची बाजू मांडताना भारतीय न्यायाधीशांच्या निष्पक्षतेवर संशय व्यक्त केला. ‘भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील काही न्यायाधीश सरकारच्या बाजूने निर्णय देतात. निवृत्तीनंतर सरकारकडून एखादे चांगले पद मिळावे, हा त्यामागील हेतू असतो. भारतातील न्यायव्यवस्था अतिशय भ्रष्ट आहे,’ असेही मल्ल्याच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. यासोबतच वकिलांनी भारतीय माध्यमांच्या तटस्थेबद्दलही शंका उपस्थित केली. ‘भारतात विजय माल्ल्या यांची मीडिया ट्रायल सुरु आहे. त्यामुळे भारतात मल्ल्या यांच्या विरोधातील खटला निष्पक्षपणे चालवला जाणार नाही,’ असेही वकिलांनी न्यायाधीशांना सांगितले.

‘भारताच्या सर्वोच्च न्यायालयाबद्दल माझ्या मनात अतिशय आदर आहे. मात्र अनेक बाबतीत मला शंका येतात. काही खटल्यांमध्ये निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या न्यायाधीशांनी सरकारच्या बाजूने निर्णय दिले आहेत. सरकारकडून चांगले पद मिळावे, यासाठी न्यायाधीश सरकारच्या बाजूने निकाल देतात. हे न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यासाठी धोकादायक आहे,’ असे माल्ल्याचे वकील डॉ. लाऊ यांनी न्यायालयाला सांगितले.