भारतातून फरार झालेला किंगफिशर एअरलाइन्सचा विजय मल्ल्या यास इंग्लंडच्या कोर्टात दणका बसला असून आता बंद पडलेल्या किंगफिशरनं सिंगापूरस्थित बीओसी एव्हिएशनला सुमारे 90 दशलक्ष डॉलर्सची भरपाई द्यावी असा आदेश इंग्लंडच्या उच्च न्यायालयानं दिला आहे.
विजय मल्ल्याचं भारतामध्ये प्रत्यार्पण करण्यासाठी सरकार प्रयत्नसील असून भारतीय बँकांचे सुमारे नऊ हजार कोटी रुपये मल्ल्याच्या किंगफिशरनं बुडवल्याचा आरोप आहे. इंग्लंडच्या उच्च न्यायालयात किंगफिशरनं भाडेतत्वावर घेतलेल्या विमानासंदर्भात खटला सुरू होता. त्यावेळी न्यायाधीश पिकेन यांनी 62 वर्षीय मल्ल्यांच्या कंपनीला हा दंड ठोठावला आहे. हा दंड का भरावा लागू नये यासाठी किंगफिशरकडे पुरेशी कारणे नसल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदवला.

बीओसी एव्हिएशननं किंगफिशर एअरलाइन्स व युनायटेड ब्रुअरीज यांना प्रतिवादी केले होते. बीओसी एव्हिएशननं या निकालाबाबत समाधान व्यक्त केलं आहे. बीओसी एव्हिएशन व किंगफिशर यांच्यामध्ये चार विमानं भाडेतत्वावर देण्यासंदर्भात करार झाला होता. त्यातली तीन विमानं किंगफिशरला दिलीही होती तर एक देणं बाकी होतं. आधीचेच पैसे आले नाहीत म्हणून चौथ्या विमानाची डिलीव्हरी देण्यात आली नव्हती. तसेच बीओसी एव्हिएशनच्या दाव्यानुसार सुरक्षा अनामत किंगफिशरकडून येणं असलेल्या रकमेपेक्षा कमी होती. त्यामुळे या कंपनीनं या रकमेच्या वसुलीसाठी इंग्लंडच्या कोर्टात खटला भरला होता.

बीओसी एव्हिएशनच्या बाजुनं निकाल देताना कोर्टानं बाकी रक्कम, दंड व कायदेशीर कारवाईचा खर्च असं मिळून किंगफिशरनं बीओसीला 90 दशलक्ष डॉलर्स द्यावेत असा निकाल दिला आहे. विशेष म्हणजे दुसरी प्रतिवादी असलेली युनायडेट ब्रुअरीज ही कंपनीही अर्ध्या रकमेच्या भरण्यासाठी बांधील असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे महिन्याभरातच विजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण करण्यात या भारताच्या मागणीची सुनावणी होणार आहे.