विश्व हिंदू परिषदेचे नवनिर्वाचित आंतरराष्ट्रीय अध्यक्ष विष्णु सदाशिव कोकजे यांनी नवी जबाबदारी मिळाल्यानंतर आपल्या कामाला सुरुवात केली आहे. विहिंप आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं ते म्हणाले. राम मंदिराबाबत बोलताना राम मंदिर लवकरच बनेल असं ते म्हणाले. अयोध्येत लवकरच भव्य राम मंदिर बनेल असं कोकजे म्हणाले. संतांच्या नेतृत्वात श्री रामाचं भव्य मंदिर लवकरच न्यायालयाचा आदेश अथवा कायदा बनवून निर्माण केलं जाईल असं ते म्हणाल्याचं वृत्त ‘आजतक’ने दिलं आहे.

शनिवारी हरयाणातील गुरुग्राम येथे विश्व हिंदू परिषदेच्या नव्या कार्यकारिणीसाठी निवडणूक झाली. विहिंपच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदासाठी प्रवीण तोगडिया यांच्या गटातील राघव रेड्डी आणि हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल निवृत्त न्या. विष्णू सदाशिव कोकजे यांच्यात लढत होती. यात कोकजे १३१ मते मिळवून राघव रेड्डींचा पराभव केला. राघव रेड्डींना फक्त ६० मते मिळाली. विंहिपच्या कार्याध्यक्ष पदासाठी आलोककुमार, कार्याध्यक्ष (विदेश विभाग) अशोकराव चौगुले, महामंत्रीपदासाठी मिलिंद पांडे, संघटन महामंत्रीपदी विनायकराव देशपांडे यांची निवड करण्यात आली. प्रविण तोगडियांबाबत बोलताना आमच्यात कोणत्याही प्रकारचा वाद नाही असं कोकजे  म्हणाले. तसंच तोगडिया नाराज देखील नाहीयेत, आम्ही त्यांच्याशी संपर्कात आहोत असं कोकजे म्हणाले.

विश्व हिंदू परिषदेच्या नव्या कार्यकारिणीत तोगडिया गटातील एकाही व्यक्तीचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे विश्व हिंदू परिषदेत तोगडिया गटाचा हा अंत मानला जात आहे.