देशाला भेट देणाऱ्या इतर देशांच्या प्रमुखांनी दिल्ली खेरीज भारतातील छोटय़ा शहरांना भेटी द्यायला हव्या. त्यामुळे देशाच्या विविधतेचा अनुभव होईल, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. पंतप्रधान झाल्यानंतर मोदी पहिल्यांदाच गुजरात दौऱ्यावर आले आहेत. चीनचे अध्यक्ष झी जिनपिंग यांचे ते बुधवारी स्वागत करतील. आगामी काळात गुजरातमध्ये विकासाचे नवे पर्व सुरू होईल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. सामान्य व्यक्तींना आशा-आकांक्षा पूर्ण होतील, असा विश्वास पंतप्रधानांनी सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर सत्कारावेळी व्यक्त केला. गुजरातमध्ये नेतृत्व करण्याच्या अनुभव केंद्रात सरकार चालवताना कामी येत असल्याचे मोदींनी स्पष्ट केले. गुजरातमध्ये चौदा वर्षे काम केले, संघटनेतून पाठिंबा मिळाला, त्याचा दिल्लीत फायदा होत आहे. अल्पावधीत देशापुढील प्रश्न, देशाच्या विविध भागांतील जनतेची स्थिती जाणून घेता आली. देशाला पुढे घेऊन जाण्याचा माझा प्रयत्न असून, आतापर्यंतच्या प्रयत्नांबाबत समाधानी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक जीवनात सत्काराचे प्रसंग अनेक आले. त्यातील काही मनापासून भावले. जनरल करिअप्पा यांचा लष्करप्रमुख स्थानिक जनतेने जेव्हा सत्कार केला होता तेव्हा विशेष आनंद होत असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्याचप्रमाणे ज्यांच्याबरोबर मी काम केले त्यांनी केलेल्या सत्काराने भारावून गेल्याचे मोदींनी सांगितले.