केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी दलित कुटुंबासंदर्भात केलेल्या विधानाबद्दल त्यांची मंत्रिमंडळातून आज संध्याकाळपर्यंत हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. हरियाणातील दलित कुटुंबावर करण्यात आलेल्या हल्ल्यासंदर्भात भाष्य करताना, कुणी कुत्र्याला दगड फेकून मारला तर त्यामध्ये सरकारची काय चूक, असे विचारत सिंग यांनी सरकारचा बचाव करण्याचा प्रयत्न केला होता. व्ही.के.सिंह यांचे हे विधान लज्जास्पद असून त्यामुळे अनुसूचित जमातींसाठी तयार करण्यात कायद्याचेही उल्लंघनही झाले आहे. त्यामुळे सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी केजरीवाल यांनी केली. आजचा दसऱ्याचा दिवस वाईट शक्ती आणि अहंकारावर चांगल्या शक्तींनी मिळविलेल्या विजयाचे प्रतिक म्हणून साजरा केला जातो. मोदींना खऱ्या अर्थाने आजचा दसरा साजरा करायचा असेल तर त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातून अहंकाराला काढून टाकले पाहिजे. त्यांनी आज संध्याकाळपर्यंत सिंह यांना बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे, असे केजरीवालांनी म्हटले.