जगातील सर्वोत्तम गुंतवणूकदार म्हणून ओळख असणाऱ्या वॉरन बफे यांनी बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या विश्वस्त पदाचा राजीनामा दिला आहे. संस्थापकांच्या घटस्फोटाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत असल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे म्हटले आहे. ९० वर्षीय बफे यांनी बुधवारी निवेदन जारी करून याची घोषणा केली. फाउंडेशनमध्ये ६५ वर्षीय बिल हे अध्यक्ष आहेत. घटस्फोटानंतरही बिल आणि मेलिंडा एकत्र काम करतील. मेलिंडा सध्या फाउंडेशनच्या उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहे,

‘माझे लक्ष्य हे संस्थेच्या ध्येयांशी सुसंगत आहे असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. बार्कशायर हॅथवेचे सर्व शेअर्स दान करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी निवेदनात म्हटले आहे. गेल्या १५ वर्षात बफे यांनी धर्मादाय संस्थांना २७ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम दान केली आहे. गेट्स फाऊंडेशनच्या तीनही बोर्ड सदस्यांमध्ये बफे यांचा समावेश होता. त्याशिवाय बिल आणि मेलिंडा हेदेखील याचे सदस्य होते. बिल आणि मेलिंडा यांनी गेल्या महिन्यात २७ वर्षानंतर विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. वॉरन बफे आणि बिल गेट्स दीर्घ काळापासून मित्र आहेत.

२७ वर्ष एकत्र संसार केल्यानंतर बिल गेट्स आणि मेलिंडा घेणार घटस्फोट

मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक असणाऱ्या बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांनी लग्नानंतर २७ वर्षांनी विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. या दोघांनीही एक संयुक्त पत्रक जारी करत यापुढे आम्ही दोघं एकत्र राहू शकत नाही, असं स्पष्ट केलं होतं. बिल गेट्स आणि मेलिंडा यांचं लग्न १९९४ साली झालं होतं. बिल गेट्स हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे.

दरम्यान, जगातील सर्वात मोठी खाजगी सेवाभावी संस्था बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनमध्ये एकत्र काम सुरू ठेवणार असल्याचे दोघांनी सांगितले. ते म्हणाले होते की, “आम्ही जीवनाच्या नवीन टप्प्यात प्रवेश करत आहोत, अशा परिस्थितीत आम्हाला एकांत हवा आहे.”