अमेरिकी लष्कराकडून गुरूवारी अफगाणिस्तानमधील आयसिसच्या तळावर टाकण्यात आलेल्या बॉम्ब हल्ल्याचा पहिला व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ सर्वप्रथम प्रसिद्ध करण्यात आला. काल संध्याकाळी ७.३२ वाजता हा हल्ला करण्यात आल्याचेही यावेळी अमेरिकी लष्कराने दिली.

मदर ऑफ ऑल बॉम्ब (एमओबी) अशा नावाने कुप्रसिद्ध असलेल्या सर्वात मोठ्या बिगर आण्विक बॉम्बने अमेरिकेने अफगाणिस्तानमधील आयसिसच्या तळावर गुरूवारी हल्ला केला होता. नानगरहार या भागातील गुहांमध्ये आयसिसचे दहशतवादी लपलेले आहेत. त्या ठिकाणी हा हल्ला करण्यात आल्याचे अमेरिकेकडून सांगण्यात आले होते.

अमेरिकेने अफगाणिस्तानातील नंगरहार प्रांतात आयसिसला लक्ष्य करताना जीबीयू-४३/बी मॅसिव्ह ऑर्डनन्स एअर ब्लास्ट (एमओएबी) नावाचा बॉम्ब टाकला. या बॉम्बला ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब’ असेही म्हटले जाते. अफगाणिस्तानातील आयसिसच्या तळांना लक्ष्य करत अमेरिकेने सर्वाधिक मोठा बॉम्ब हल्ला केला आहे. या कारवाईनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याचे अभिनंदन केले.

मॅसिव्ह ऑर्डनन्स एअर ब्लास्टचा वापर शत्रूवर मानसिक दबाव निर्माण करण्याच्या उद्देशाने केला जातो. गुरुवारी अमेरिकेने या बॉम्बचा वापर करण्याआधी कोणत्याही देशाने या बॉम्बचा वापर केला नव्हता. त्यामुळे मॅसिव्ह ऑर्डनन्स एअर ब्लास्टचा वापर करणारा अमेरिका हा पहिला देश ठरला आहे. अनेक वृत्तांनुसार, अफगाणिस्तानातील नंगरहारमध्ये या बॉम्बच्या वापरानंतर तब्बल ३०० मीटरचा खड्डा पडला आहे.

मदर ऑफ ऑल बॉम्ब नावाने ओळखल्या जाणाऱ्या बॉम्बला जाळीदार पंख असतात. बॉम्ब आकाशातून टाकण्यात आल्यानंतर पंख बॉम्बच्या वजनाला नियंत्रित करतात. हा बॉम्ब इतका मोठा असतो की तो फक्त विमानाच्या माध्यमातूनच टाकला जाऊ शकतो. या बॉम्बला पॅलेटवर ठेवले जाते. यानंतर पॅराशूटच्या मदतीने बॉम्बला विमानाबाहेर टाकले जाते. पॅराशूटच्या मदतीने पॅलेटला खेचण्यात आल्यानंतर पॅलेट बॉम्बपासून वेगळे करण्यात येते आणि त्यानंतर बॉम्ब टार्गेटवर टाकला जातो. यानंतर बॉम्ब लक्ष्याच्या दिशेने वेगाने जातो. उपग्रहाच्या माध्यमातून या बॉम्बचे नियंत्रण केले जाते.

जमिनीपासून सहा फूट अंतरावर बॉम्बचा स्फोट घडवण्यात येतो. बॉम्ब स्फोटाची तीव्रता जास्तीत जास्त राखण्यासाठी जमिनीपासून काही अंतरावर असतानाच स्फोट घडवला जातो. मोठे लक्ष्य उद्ध्वस्त करण्यासाठी आणि जमिनीवरील सैन्याला, शस्त्रास्त्र साठ्याला उद्ध्वस्त करण्यासाठी मदर ऑफ ऑल बॉम्बचा वापर केला जातो. या स्फोटाची तीव्रता ११ टिएनटी बॉम्बच्या स्फोटांएवढी असते. दुसऱ्या महायुद्धात जपानच्या हिरोशिमावर टाकण्यात आलेल्या अणूबॉम्बमध्ये १५ टन टिएनटी स्फोटके होती.